अहिल्यानगरः भाजपमधील तिन्ही जिल्हाध्यक्ष पदांसाठी इच्छुक असलेल्यांची नावे पंधरा दिवसांपूर्वी पक्षश्रेष्ठींकडे बंद पाकिटातून धाडली गेली. मात्र, त्यावर अद्यापी निर्णय झालेला नाही. इच्छुकांची प्रतीक्षा लांबली गेली आहे. कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे, मात्र निवड जाहीर व्हायला तयार नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या रस्सीखेचीतून ही निवड रखडल्याची चर्चा होत आहे.
भाजपचे महानगर, दक्षिण व उत्तर असे तीन जिल्हाध्यक्ष आहेत. पक्षाने निवडणुकीसाठी नियुक्त केलेले पर्यवेक्षक तथा मंत्री जयकुमार रावल, निरीक्षक लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप व आमदार विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत दि. २७ एप्रिलला शिर्डीमध्ये इच्छुकांची चाचपणी करत पदाधिकाऱ्यांकडून कल जाणून घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली शिफारस पत्रे बंद पाकिटातून प्रदेश निवडणूक समितीकडे पोहोच करण्यात आली. त्यानंतर अद्याप नावे जाहीर झालेली नाहीत.
महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी सचिन पारखी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, बाबासाहेब सानप यांची, दक्षिण जिल्हाध्यक्ष पदासाठी दिलीप भालसिंग, युवराज पोटे, अशोक खेडकर, रवी सुरवसे, बाळासाहेब महाडिक, सचिन पोटरे तसेच उत्तर जिल्हाध्यक्ष पदासाठी जालिंदर वाकचौरे, शिवाजी गोंदकर, नितीन कापसे आदींची नावे चर्चेत आहेत.
या निवडी पाच मेपर्यंत जाहीर होतील अशी पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती. जिल्हाध्यक्ष पदावर विखेसमर्थक की शिंदेसमर्थक हाच पक्षापुढील पेच असल्याने निवड लांबल्याची चर्चा होत आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातूनच रस्सीखेच होत असल्याने प्रतीक्षा लांबली गेली आहे. उत्तर जिल्हाध्यक्ष पदावर विखे समर्थकच असेल याबद्दल पक्षात वाद नाही, मात्र महानगर व दक्षिण जिल्हाध्यक्षपदी कणाची वर्णी लागणार यातून रस्सीखेच तीव्र आहे.
कालच, रविवारी पालकमंत्री विखे यांनी पक्षाच्या नगर शहरातील माजी नगरसेवकांची बैठक घेत त्यांना निवडणुकीसाठी तयारी करण्याची सूचना करत विकासकामांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे निवडणुकीसाठी पक्षाने विखे यांच्याकडे सूत्रे सोपवल्याची चर्चा होत आहे.