* कराडमध्ये दिवसभर उपोषण
* सेना-भाजप, मनसेची संतप्त निदर्शने
दुष्काळग्रस्तांबद्दल असभ्य भाषेत वक्तव्य केल्यानंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया आणि काल शरद पवार यांनी केलेल्या कानउघाडणीच्या पाश्र्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्मक्लेश म्हणून कराडच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर रविवारी दिवसभर उपोषण केले. या गांधीगिरीविरोधात शिवसेना, भाजपा व मनसेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून संतप्त भावना व्यक्त केल्या.
अनावधानाने केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्याची खंत वाटत असल्यामुळे चव्हाणसाहेबांच्या सुसंस्कृतपणाचा आदर्श ठेवून यापुढील राजकीय जीवनाची वाटचाल करण्याचा आपला मनोनिग्रह असल्याचा निर्वाळा उपमुख्यमंत्र्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
प्रारंभी या उपोषणाचे वृत्त कार्यकर्त्यांनाही अचंबित करणारे ठरले. नंतर स्थानिक नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी दादांच्या समवेत उपोषणात सहभाग घेतला. नंतर संपूर्ण जिल्हातील लोकप्रतिनिधी उपोषणस्थळी दाखल झाले. दरम्यान, साडेअकरा वाजण्याच्या सुमारास समाधीस्थळाबाहेरील रस्त्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निर्दशने केली असता, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. पोलिसांनी हस्तक्षेप करून राष्ट्रवादीच्या दोघांना तर भाजपच्या सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अजित पवार यांच्या उपोषणस्थळी शिवसेनेचे माजी आमदार शंभूराज देसाई यांनी अचानक भेट देऊन सर्वाना आश्चर्यचकित केले. दरम्यान, अजित पवार म्हणाले की, सामाजिक कार्यात काम करताना अनावधानाने चुका होत असतात. ही खंत व्यक्त करण्यासाठी चव्हाणसाहेबांच्या समोर नतमस्तक होण्याचे आपण ठरवले. यात राजकारण नाही आणि हा प्रसिद्धीचा स्टंटही नाही.
अजित पवारांचे निवेदन
राज्यातील जनतेला साक्ष ठेवून मी शपथपूर्वक सांगतो की, माझी ती विधाने दुष्काळग्रस्तांशी संबंधित नव्हती. दुष्काळग्रस्तांच्या भावना मी दुखवू शकत नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरताना मी दुष्काळ अनुभवला आहे, असे निवेदन त्यांनी सादर केले.
शरद पवार यांचे मौन
पत्रकारांनी शरद पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘आत्मक्लेशा’विषयी प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. आपणास जे बोलायचे होते, ते कालच ठाण्यात बोललो आहे. त्याच त्या विषयावर आपल्याला बोलायचे नाही, असे ते म्हणाले व तेथून निघून गेले.
शिवराळ वक्तव्याबद्दल उपोषण नव्हे तर राजीनामाच दिला पाहिजे. ‘बूंद से गयी वो हौदसे नही आती’- राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
अजितदादांना खरोखरीच पश्चात्ताप झाला असेल तर त्यांनी मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन दुष्काळग्रस्तांसाठी काम करावे – विरोधी पक्षनते विनोद तावडे
राजकीय पुढाऱ्यांना आत्मक्लेश करावेच लागतात – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण</p>