मोठमोठे नेते देणा-या सांगलीत घराणेशाही लादण्याचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य जनतेचा स्वाभिमान नाकारणे, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपाचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत केली. जिल्ह्याच्या पश्चिम भागात बारमाही वाहणारी कृष्णा नदी असताना निम्मा जिल्हा दुष्काळाने होरपळतो. या पाठीमागे नेतृत्व करणा-याचे कर्मदारिद्रय़च कारणीभूत असल्याचे  मोदी यांनी यावेळी सांगितले.
बडोद्याहून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगलीच्या कृष्णातीरी असलेल्या गणेशाला वंदन करून छत्रपती शिवाजीमहाराजांच्या भूमीत आपण आलो असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, या जिल्ह्याने देशाला मोठमोठे नेते दिले. मात्र आजही निम्मा जिल्हा दुष्काळाने होरपळत असून पाण्यासाठी टाहो फोडतो, हे चित्र निराशाजनक आहे. घराणेशाही ही लोकशाहीचा शत्रू असून समाजशक्तीला नाकारते. जनतेच्या स्वाभिमानाला ठेच यामुळे पोहोचू शकते. त्यामुळे येथील जनता स्वतंत्र भारतात आहे की, मोगलांच्या साम्राज्यात आहे असा प्रश्न पडतो.  जिल्ह्याचे चार चार मंत्री सत्तेत असतानाही जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही. याचे आश्चर्य वाटते.
यावेळी बोलताना लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील म्हणाले की, दुष्काळी भागातील पाणी योजना पूर्ण करण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. वसंतदादांनी उभ्या केलेल्या संस्था बंद पाडण्याचे काम त्यांच्या वारसदारांनी केले असून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न पशाच्या आणि सत्तेच्या जोरावर करीत आहेत. हे जनता यशस्वी होऊ देणार नाही.
हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पंतप्रधान हा लोकनेता असावा लागतो. मात्र काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे लोकनेते नसून मुख्य कार्यकारी अधिकारी असल्यासारखे  वागतात. सत्तेची सूत्रे दुस-याकडेच राहिल्याने विकासाचे वाटोळे झाले आहे. नरेंद्र मोदी यांना पािठबा देत असताना आपण शेतक-यांसाठी पाणी योजना, रंगराजन व स्वामीनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारणे या मुद्दय़ांवर सहमती मिळविली असून कोणत्याही स्थितीत शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारसरणीला सोडणार नाही.
यावेळी सुरेश खाडे, प्रकाश शेंडगे यांचीही भाषणे झाली. या सभेसाठी सांगली, हातकणंगले मतदारसंघासह कर्नाटकातील चिक्कोडी मतदारसंघातील कार्यकत्रे उपस्थित होते. ३८ ते ३९ डिग्री सेल्सियस तापमान असतानाही २ लाखांहून अधिक लोक मोदी यांना ऐकण्यासाठी संजय भोकरे कॉलेजच्या मदानावर उपस्थित होते. ब-याच वेळा सांगली-मिरज रस्ता वाहतुकीच्या कोंडीमुळे ठप्प होत होता. या सभेसाठी तरुणाईची प्रचंड गर्दी दिसून आली.
 मोदी यांचे सभास्थळी आगमन होण्यापूर्वी संजय भोकरे कॉलेजच्या १० विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास मोदी यांना सुरक्षारक्षकांनी मनाई केली होती.