Anna Hazare : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या आरोपामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी काही पुराव्यांचं सादरीकरण केलं होतं. या आरोपांनंतर देशातील राजकारण चांगलंच तापलेलं असताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे बॅनर पुण्यातील पाषाणमधील रस्त्यावर लावण्यात आलं होतं.

या बॅनरची राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, या बॅनरनंतर आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उत्तर दिलं आहे. तसेच अशा प्रकारचं बॅनर लावण्यात आल्यामुळे अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘मी १० कायदे आणले. आता ९० वर्षांनंतरही मी काम करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं ही अपेक्षा चुकीची असल्याचं म्हणत बॅनर लावणाऱ्यांना अण्णा हजारे यांनी उत्तर दिलं आहे.

अण्णा हजारे काय म्हणाले?

“भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आणि भ्रष्टाचारा आणले. माहितीचा अधिकार कायदा देशाला मिळाला. खूप मोठ्या प्रमाणात जागृती आली. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोकआयुक्त असे १० वेगवेगळे कायदे आणले. मग ९० वर्षांचं झाल्यानंतरही मी काम करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं अशी जर कोणी अपेक्षा करत असेल तर हे चुकीचं आहे”, असं अण्णा हजारे यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटलं आहे.

“मागच्या काळात मी जे केलं ते आताच्या तरुणांनी आता करावं. युवकांनाही वाटलं पाहिजे की आपलं काही कर्तव्य आहे की नाही. मी देशाचा नागरिक आहे, या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांची देखील आठवण ठेवली पाहिजे. मात्र, नुसतं बोट दाखवायचं आणि हे करा ते करा. मात्र, यामधून काहीही होणार नाही. तरुणांनी जागं झालं पाहिजे. मी तरुणांकडे मोठ्या अपेक्षाने पाहत आहे. युवा शक्ती एक राष्ट्र शक्ती आहे. ही युवा शक्ती जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही. मी हे कायदे आणले आणि तरुणांच्या हाती दिले. मग आज एवढ्या वर्षांनंतरही असा आवाज कानांवर येतो की आण्णा हजारेंनी जाग व्हावं, ही अपेक्षा चुकीची आहे”, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.

पुण्यातील बॅनरवर काय मजकूर होता?

अण्णा आता तरी उठा….कुंभकर्णसुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता… तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा….. होय मतांची चोरी आहे. india against votechori देशात मतांची चोरी होत असताना, देशात भ्रष्टाचार फोफावला असताना, देशात हुकूमशाही माजलेली असताना, देशाची लोकशाही धोक्यात असताना, अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?, अशा आशयाचं बॅनर लावण्यात आलं होतं.