मला पक्षाच्या सुकाणू समितीवरून काढण्यात आले. जाणीवपूर्वक पक्षातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही मी यांची आरती करावी काय? माझा पक्ष सोडण्याचा अद्यापही विचार नाही. परंतु वारंवार असाच अन्याय होत राहिल्यास मला पक्षाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे दिला.

भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र स्तरावरील समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी येथे आयोजित करण्यात आली होती.

पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, की पक्ष उभारणीसाठी मी मेहनत घेतली. परंतु त्याच पक्षाने मला फळ काय दिले? मला पक्षात बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगवेगळ्या चौकशीचे आदेश दिले, कोणतेही कारण नसताना पक्षाने माझ्यावर कारवाई का केली? मात्र अशी कारवाई माझ्यावरच नव्हे तर अगोदर गोपीनाथ मुंडे यांच्यावरही करण्यात आली होती. मला स्पर्धेतून बाहेर करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षातील अशा लोकांची मी आरती करावी काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

श्रेष्ठींकडून कारवाईची अपेक्षा

विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात अ‍ॅड. रोहिणी खडसे यांना पराभूत करण्यात आल्याच्या आरोपाबाबत खडसे म्हणाले, याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे नावानिशी पुरावे, ध्वनिफिती दिल्या आहेत. आपण त्यांना हे पुरावे, नावे माध्यमांसमोर जाहीर करण्याची परवानगी मागितली होती, मात्र ती त्यांनी दिलेली नाही.  याप्रकरणी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडे सर्व माहिती ते देणार आहेत. त्यांच्या भेटीच्या वेळी आपल्यालाही सोबत घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांना सर्व माहिती दिल्यानंतर श्रेष्ठी निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोडय़ा करणाऱ्यांवर कारवाई करतील, असे आश्वासनही पाटील यांनी दिले असल्याचे खडसे यांनी सांगितले.