मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं नाव घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यूटी असा उल्लेख करत ते लंडनला येतात, मोठमोठ्या संपत्ती घेतात आणि थंडगार हवा खातात असं ऋषी सुनक यांनी सांगितल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला. तसेच ऋषी सुनक मला याविषयी सगळं सांगणार आहे, असंही नमूद केलं. ते सोमवारी (१२ सप्टेंबर) जळगावमधील पाचोरा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आपला देश महासत्तेकडे चालला आहे. आज आपल्या देशाचं नाव लोक अभिमानाने घेऊ लागले आहेत, मग यांना पोटदुखी का असावी. काही करार केले त्यामुळे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात उद्योग येतील. आपल्याला नोकऱ्या मिळतील, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काम मिळेल. मग याची पोटदुखी का? उलट याचं स्वागत करायला पाहिजे.”

“त्यांच्या मनावरचा ताबा गेलाय”

“यांचं सरकार गेल्यावर त्यांना विश्वास नाही की, सरकार गेलंय की, राहिलं. त्यांच्या मनावरचा ताबा गेलाय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ते काहीही बोलू लागले आहेत.”

“मी त्यावर बोलणार नव्हतो, पण मुद्दाम सांगतो”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटलो. ते आपल्या भारतातील जुने नागरिक. त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भेटला आणि मलाही आपला माणूस इंग्लंडचा पंतप्रधान झाला याचा अभिमान होता. काही लोकांनी त्यावर टीका केली. काय भेटले, कसे भेटले, काय बोलले, कुठल्या भाषेत बोलले याला काय अर्थ आहे. मी त्यावर बोलणार नव्हतो, पण त्यांनी विचारलं म्हणून मी मुद्दाम सांगतो.”

“ते दरवर्षी लंडनला येतात, मोठ्यामोठ्या संपत्ती घेतात”

“ऋषी सुनक यांनी मला विचारलं की, यूटी कसे आहेत. त्यावर मी विचारलं का? तर ते म्हणाले की, ते दरवर्षी लंडनला येतात. मोठ्यामोठ्या संपत्ती घेतात, थंडगार हवा खातात. त्यांची खूप माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही एकदा लंडनला आलात की, मी सगळं सांगतो,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. हे बोलताना शिंदेंनी उपस्थितांना यूटी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे असं विचारलं. त्यावर उपस्थितांनी उद्धव ठाकरे असं म्हटलं. यानंतर एकनाथ शिंदेंनी हे मत व्यक्त केलं.

हेही वाचा : “ऋषी सुनक यांच्याबरोबर फोटो काढला, पण काय बोलले? अन्…”, उद्धव ठाकरेंनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी एवढंच सांगतो की, आम्हाला सगळं माहिती आहे. आमच्यावर बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. अन्यथा पाटणकर काढा घेण्याची वेळ येईल,” असा इशाराही एकनाथ शिंदेंनी दिला.