नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळणार की राष्ट्रवादीला मिळणार? याची चर्चा सुरू असतानाच आज शिंदे गटाने उबाठा गटाला मोठा धक्का दिला. पाच वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार संजय पवार आणि आरपीआयचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, बबनराव घोलप यांनी आम्हाला तिकडचे काही अनुभव सांगितले. आमचेही तसेच काही अनुभव होते. आता त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा दाखवून आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांनी स्वतःसाठी काहीही न मागता, त्यांच्या समाजाला न्याय देण्याची भूमिका बोलून दाखवली. त्यांनी याअगोदरच निर्णय घ्यायला हवा होता. पण उशीरा का होईना, त्यांनी योग्य निर्णय घेतला.

उद्यापासून बबनराव कचरा होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोलप यांचे स्वागत करत असताना उबाठा गटावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “बबनराव घोलप आमच्यात आल्यामुळे उद्यापासून त्यांना कचरा असे संबोधले जाईल. त्यांना गद्दर म्हटले जाईल.” मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर सर्व उपस्थितांमध्ये हशा पिकला.

आधीन लगीन कोंढाण्याचं…

मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेची उमेदवारी अद्याप जाहीर केली नाही. याबाबत प्रश्न विचारला असता, “आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं”, असा डायलॉग त्यांनी मारला. आधी सर्व सहकाऱ्यांची यादी जाहीर केली. त्यानंतर श्रीकांतचे नाव जाहीर करेल. माझ्याजागी दुसरा कुणी असता तर पहिल्याच यादीत मुलाचे नाव जाहीर केले असते. पण मी कार्यकर्त्यांचा नेता असल्यामुळे आधी कार्यकर्त्यांचे काम करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएचं ऐकून मला बाहेर काढलं – घोलप

दरम्यान बबनराव घोलप यांनी उबाठा गट सोडत असताना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली. “मिलिंद नार्वेकर कोण आहेत? त्यांचे ऐकून मला पक्षातून बाहेर काढले. नार्वेकरांमुळे अनेकजण पक्ष सोडून गेले आहेत. मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्ष वाढवला. मात्र मिलिंद नार्वेकर यांचे ऐकून मला अचानक बाजूला सारण्यात आले. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वारसा घेऊन पुढे जात आहेत. यापुढे त्यांच्याबरोबर मी काम करणार आहे. जर त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, तर त्यांनाही सोडेल”, अशी प्रतिक्रिया बबनराव घोलप यांनी दिली.