धाराशिव : चार दिवसांपूर्वी सगळीकडे जागतिक पितृदिवस साजरा केला जात असताना त्याच दिवशी जन्मदात्या बापाने पोटच्या मुलीसोबत केलेला किळसवाणा प्रकार समोर आला आहे. सततच्या लैंगिक शोषणामुळे मुलीला दिवस गेले असून सध्या ती तीन महिन्यांची गरोदर आहे. बापाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या संतापजनक प्रकरणी उमरगा तालुक्यातील एका पोलीस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला. नराधमाची सुरुवातीला पोलीस आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
उमरगा तालुक्यातील एक मोठ्या गावात ४५ वर्षीय मजूर त्याची पत्नी आणि १५ वर्षीय मुलगी वास्तव्यास होते. पती-पत्नी दोघेही मोलमजुरी करून चरितार्थ चालवित. व्यसनाच्या आहारी गेलेल्या नराधम बापाने पत्नी घरात नसताना पोटच्या मुलीवरच झडप मारली. याबाबत कोणाला सांगितल्यास बरे होणार नाही अशी धमकीही दिली. बापाच्या धमकीमुळे घाबरून गेलेल्या अल्पवयीन मुलीला सलग तीन महिने नराधम बापाच्या दुष्कृत्याला सामोरे जावे लागले. या किळसवाण्या प्रकारामुळे तिला गर्भधारणा झाली. जागतिक पितृदिनी ही अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे तपासणी नंतर समोर आले आहे.
आणखी वाचा-दर्शना पवार मृत्यू प्रकरण, तिचा मित्र राहुल हांडोरे कुठे आहे? पोलिसांकडून शोध सुरु
मुलीच्या पोटात दुखायला लागल्यानंतर नराधम पित्याने पत्नीला सोबत घेऊन तिची आरोग्य तपासणी केली. सोनोग्राफी केल्यानंतर मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. गावातीलच दोन मुलांनी अत्याचार केल्यामुळेच आपल्या मुलीला दिवस गेले असल्याची तक्रार देण्यासाठी बापानेच मुलीला भाग पाडले. भीतीपोटी बापाच्या सांगण्यावरून पीडित मुलीने पोलिसांनाही तशीच तक्रार दिली. तपासात मुलीने दिलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. दरम्यान मुलीचे समुपदेशन करणाऱ्या महिला पोलिसांनी विश्वासात घेऊन पीडितेला बोलते केले. त्यानंतर मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या किळसवाण्या प्रकाराची संतापजनक हकीकत मुलीने त्यांच्यासमोर विशद केली.
जन्मदात्या वडिलांनीच हे नीच कृत्य केल्याचे उघड झाल्यानंतर. पोलिसांनी वरिष्ठ्यांच्या मार्गदर्शनाखाली नराधम पित्याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार बलात्कारचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयासमोर आरोपीला हजर केले असता सुरुवातीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सध्या आरोपीची धाराशिव येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आणखी वाचा- Video : पेट्रोल पंपावरील ‘त्या’ व्हायरल व्हिडीओने खळबळ, मोबाईल फोनवर बोलणे जिवावर बेतू शकते
मनोधैर्य योजनेतून मुलीच्या पुनर्वसनासाठी लवकरच मदत
कायद्याप्रमाणे पीडितेला मनोधैर्य योजनेअंतर्गत दिलासा देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. लवकरच शारीरिक आणि मानसिक उपचार तसेच पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी प्राधान्याने प्रयत्न करीत आहोत. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीचे आणि तिच्या आईचे समुपदेशन करून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महिला कर्मचारी त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती उमरग्याचे उपविभागीय पोलीस अधीकारी रमेश बरकते यांनी दिली.