लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : एसटी बसमधून गावी परतत असताना एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रकार आष्टा ते सांगली प्रवासादरम्यान घडला. ही बाब पीडितेने सांगली बसस्थानकावर येताच सांगितल्यावर नागरिकांनी संशयिताला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

पुण्यात नोकरी करणारी ही तरुणी काल रात्री पुण्याहून कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या गावी जाण्यासाठी शिवशाही बसने निघाली होती. रात्री ११ च्या सुमारास संशयित आष्टा बस स्थानकावर बसमध्ये आला. आष्टा ते सांगली प्रवासादरम्यान त्याने विनयभंग केला. बस सांगलीत आल्यानंतर हा प्रकार पीडितेने वाहक-चालकांना सांगितला. हा प्रकार समजताच अन्य प्रवाशांनीही या तरुणाकडे विचारणा करत असताना पोलीसही बसस्थानकात पोहचले. पोलिसांना पाहताच तरुणाने पलायन करण्याचा प्रयत्न केला. अन्य प्रवासी व पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडून बेदम चोपही दिला. यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

सहा वर्षांच्या मुलावर अत्याचार

दरम्यान एका सहा वर्षांच्या मुलावर परप्रांतीयाकडून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार कवठेमहांकाळ येथे उघडकीस आला. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत मिळालेली माहिती अशी, कवठेमहांकाळमधील विद्यानगर परिसरात गुरुवारी दुपारी एका सहा वर्षांच्या मुलाला खाऊ देण्याच्या आमिषाने संशयिताने घरी बोलावले. यानंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मुलाने घरी जाऊन पालकांना सांगताच संशयिताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार संशयित लोकेन केवलराम कासडे (वय २१, रा. खंडवा, जि. मध्यप्रदेश) याला बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.