मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंभूराज देसाईंना खोचक टोला लगावला. “शंभूराज देसाईंसारख्या लहान व्यक्तीवर मी बोलत नाही,” असं विधान शरद पवारांनी केलं. एका पत्रकार परिषदेत देसाईंबाबत प्रश्न विचारला असता पवारांनी हे विधान केलं आहे.

शरद पवारांच्या या विधानावर शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. होय, मी शरद पवारांपेक्षा वयाने लहानच आहे. पण लहान मुलगाही किती चांगलं काम करू शकतो, हे शरद पवारांना दाखवून देऊ, असं प्रत्युत्तर देसाईंनी दिलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- राज ठाकरेंच्या भेटीसाठी नारायण राणे ‘शिवतीर्था’वर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवारांच्या विधानावर भाष्य करताना शंभूराज देसाई म्हणाले, “होय, मी त्यांच्यापेक्षा वयाने लहानच आहे. शरद पवार वयाने खूप मोठे आहेत. माझ्या वडिलांपेक्षा त्यांचं वय अधिक आहे. त्यामुळे त्यांना आम्ही लहानच वाटणार, पण ठीक आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. मी त्यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही. पवारांच्या आशीर्वादाने मला कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा समन्वयक मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी ही संधी दिली. त्यामुळे आम्ही कामातून शरद पवारांना दाखवून देऊ की, लहान मुलगाही किती चांगलं काम करतो, हे मी शरद पवारांना नम्रतापूर्वक सांगत आहे,” अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.