कराड : बांधकाम परवान्यासाठी दहा लाखांच्या लाचेपैकी पाच लाखांच्या व्यवहारातील संशयित, चार महिन्यांपासून फरार असलेले तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना पोलिसांनी साताऱ्यात आज गुरुवारी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड शहरातील सिटी सर्व्हे क्र. ७९ येथील पाच मजली इमारतीच्या प्रस्तावित बांधकामासाठी सन २०२३ मध्ये सुधारित परवानगीसाठी बांधकाम व्यावसायिकाने अर्ज केला होता. त्यानंतर परवानगी प्रक्रियेस गती देण्यासाठी तक्रारदाराने सहायक नगररचनाकार शिरगुप्पे यांच्याकडे पाठपुरावा केला असता, स्वानंद शिरगुप्पे आणि खासगी व्यक्ती अजिंक्य देव यांनी त्यांची भेट घेऊन परवानगी प्रक्रियेतील वाढीव चटईक्षेत्रासाठी (एफएसआय) बाजारभावानुसार मिळकतीच्या १२ टक्के म्हणजेच १० लाख रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराच्या तक्रारीनंतर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २४ मार्च २०२५ रोजी सापळा रचत पाच लाखांच्या पहिल्या हप्त्यासह पालिकेचा कर्मचारी तौफिक शेख याला रंगेहाथ पकडले होते.
शंकर खंदारे हे त्यावेळी मुख्याधिकारी पदावर कार्यरत नव्हते. मात्र, त्यांनी अजिंक्य देव याच्याकडून प्राप्त फाईलवर मागील तारखेचे चलन व्हॉट्सॲपवर मागवून त्यावर स्वतःच्या सह्या केल्या. त्या चलनाद्वारे परवानगी प्रक्रियेस वैधता दिली जात असल्याने, लाच स्वीकारण्यास पोषक वातावरण निर्माण झाले होते. ही कृती त्यांनी सहायक नगररचनाकार शिरगुप्पे आणि तौफिक शेख यांच्या संगनमताने केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान, शंकर खंदारे यांनी वरिष्ठ न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. परंतु, न्यायालयाने तो फेटाळला. अखेर आज गुरुवारी (दि. २४) सकाळी त्यांना साताऱ्यात अटक करण्यात आली. कराडच्या फौजदारी न्यायालयात त्यांना न्या. डी. बी. पतंगे यांच्यासमोर हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्यांना २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शंकर खंदारे यांच्यासह सहायक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, पालिकेचा कर्मचारी तौफिक शेख आणि खासगी व्यक्ती अजिंक्य देव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन जणांना यापूर्वीच अटक झाली होती, तर खंदारे चार महिन्यांपासून फरार होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने ९ मे रोजी तो फेटाळला. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली.