Avimukteshwaranand : “वाघाची मावशी फारच होती आळशी”; “आली आली दिवाळी, बहीण भावाला ओवाळी” ही वाक्य आहेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची. गेल्या दोन दिवसांपासून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे मराठीचे धडे गिरवत आहेत. मराठी भाषा आपण शिकणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार ते रोज मराठी शिकत आहेत. आज माध्यमांसमोर त्यांनी काही मराठी वाक्यं वाचून दाखवली. महाराजांना ळ नीट उच्चारता येत नाही असं त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं. पण दोन दिवसांत बरीच प्रगती असून पुढच्या दोन महिन्यांत ते चांगलं मराठी बोलतील असंही दोन शिक्षकांनी सांगितलं.

शंकराचार्यांना मराठी शिकवणारे शिक्षक काय महणाले?

मराठी उत्तरं शंकराचार्यांना देता येत आहेत. दोन महिने मुक्काम इथेच आहे का? हे विचारलं असता शंकराचार्यांनी दोन महिने इथेच मुक्काम आहे असं सांगितलं. तसंच सकाळी मी फळांचा नाश्ता केला असंही त्यांनी मराठीत सांगितलं. चाळीस दिवस मी महाराष्ट्रातच मुक्काम करणार नंतर बाहेर जाणार असंही त्यांनी सांगितलं. शंकराचार्यांना मराठी शिकवणारे शिक्षक म्हणाले की त्यांचे उच्चार आणि ळ यांचा थोडी समस्या आहे. पण दोन महिन्यांत ते व्यवस्थित मराठी बोलतील अशी मला अपेक्षा आहे. उद्या सकाळी ११ वाजता तुमची पुन्हा शिकवणी असेल असं अविमुक्तेश्वरानंद यांना सांगण्यात आलं. त्यावर ते हो असं मराठीत म्हणाले.

मराठीबाबत काय म्हणाले अविमुक्तेश्वरानंद?

यानंतर जेव्हा त्यांना तुम्ही मराठी शिकत आहात का? हे विचारलं असता आपण ज्या राज्यात येऊन राहतो आहोत तिथली भाषा आली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. टीव्ही ९ मराठीशी अविमुक्तेश्वरानंद यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांनी मराठीच्या वादावरही भूमिका मांडली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसांपूर्वी मराठी बाबत काय म्हणाले होते अविमुक्तेश्वरानंद?

कुठलंही कार्य करायचं असेल त्याची सुरुवात मोठ्या स्वरुपात करायची असते. मराठीचा प्रचार प्रसार कुणी करत असेल तर कुणाला काही अडवण्याचा प्रश्न येत नाही. पण मराठी भाषेची ओळख ही कानशिलात लगावण्याची भाषा अशी जर कुणी बनवत असेल तर त्यामुळे मराठीला यश मिळेल की कमी होईल? महाराष्ट्रात राहणारेच मराठीवर प्रेम करतात असं नाही. सगळा देश मराठीवर प्रेम करतो. झाशीची राणी लक्ष्मीबाई कुठून आली होती? कितीतरी नावं घेता येतील. हिंदी ही आपल्या देशाची राजभाषा आहे. देशाच्या बाहेरही अनेक भाग आहेत जिथे मराठी भाषा बोलली जाते असंही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं होतं. त्याचवेळी त्यांनी हेदेखील सांगितलं होतं की मराठी शिकणार आहे. त्यानुसार आता त्यांनी मराठी भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे.