ऊस भाववाढीच्या प्रश्नावर राज्यात सहा वर्षांनंतर प्रथमच तिनही शेतकरी संघटना एकत्र आल्या असून सांगली येथे परवा (बुधवार)भावे नाटय़ मंदिरात संघटनांचे नेते शरद जोशी, खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील हे एकत्र येत आहेत. भावाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली हस्तक्षेप करण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिला. तसेच राज्य सरकारने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू केल्याने संघटना अनेक वर्षांनंतर एकत्र आल्या आहेत.
शेतकऱ्यांना लुटायला जर कारखानदार एकत्र येत असतील तर शेतकऱ्यांच्या संघटनांनी एकत्र का येऊ नये, अशी भूमिका असल्याचे एक नेते कालिदास आपेट यांनी सांगितले. सांगली येथील ऊस परिषदेस शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार शेट्टी, रघुनाथदादा पाटील, रवी देवांग, पाशा पटेल, वामनराव चटप, शंकरअण्णा गोडसे, सदाभाऊ खोत, बाळासाहेब वाळके, शिवाजी नांदखिले, अमर हबीब, दशरथ सावंत आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
शेतकरी संघटनेचे नेते कुंभिकासारी (कोल्हापूर) येथे २००७ मध्ये एकत्र आले होते. त्यानंतर तिनही संघटनांची ‘एकला चलो’ भूमिका होती. चंद्रपूर येथे २००४ साली झालेल्या अधिवेशनात सर्व नेते एकत्र होते. जोशी यांनी केलेली मांडणी सर्वाना आजही मान्य आहे. तिनही संघटना खुल्या अर्थव्यवस्थेच्या समर्थक आहेत. मात्र, राजकीय कारणावरून त्यांच्यात मतभेद आहेत. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेने शिवसेना-भाजपाला पािठबा दिला. विषेश म्हणजे हा ठराव शेट्टी यांनी मांडला होता. पण नंतर त्यांनी जातीयवादी पक्षाबरोबर युती करण्यास विरोध दर्शविला. अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढविली. नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. पाच वर्षांपूर्वी रघुनाथदादा पाटील हे संघटनेतील अमर हबीब, आपेट, बबनराव काळे, नांदखिले, शंकर गोडसे आदी लढाऊ कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बाहेर पडले. त्यांनी स्वतंत्र संघटना स्थापन केली. तिनही संघटना स्वतंत्रपणे लढत होत्या. असे असले तरी शेट्टी किंवा पाटील यांनी जोशी यांच्यावर टीका केलेली नव्हती. जोशी यांनाच ते नेते मानत असत. काही मुद्दय़ांवर त्यांचे मतभेद होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली मुख्यमंत्र्यांनी ऊस भावाच्या प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास नकार दिला. पोलिसांनी सांगली येथे गोळीबार केला. इंदापूर येथे आंदोलन करणाऱ्या ३०० कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदविले. शेट्टी, खोत यांना तुरूंगात टाकले. सर्व कारखाने भावाच्या प्रश्नावर एकत्र आले. त्यामुळे संघटनांनी एकत्र यावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. आता संघटनांचे नेते आपसातील मतभेद विसरून एकत्र आले आहेत. ऊस भावाच्या आंदोलनामुळे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याने पहिला हप्ता २ हजार ५०० रूपये, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील भिमाशंकर शुगर या खासगी कारखान्याने २ हजार ६०० रूपये दर देण्याचे जाहीर केले. आता नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांतील कारखान्यांची त्यामुळे गोची झाली आहे.