गेल्या काही दिवसांपासून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची पत्रकार परिषद चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधून नावं वगळण्याचे किंवा नव्याने समाविष्ट करण्याचे प्रकार घडल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करत असल्याचाही दावा त्यांनी केला असून त्यावर आयोगाला जाब विचारला आहे. यासंदर्भात आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली असून त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची सविस्तर भूमिका मांडली आहे. या मुद्द्यावर त्यांनी राहुल गांधींची पाठराखणदेखील केली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांना राहुल गांधींची पत्रकार परिषद व निवडणूक आयोगावरील प्रश्नचिन्ह यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी आयोगावर टीका केली.”राहुल गांधी किंवा अन्य लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचा रोख निवडणूक आयोगाच्या एकंदरीत कामाच्या पद्धतीवर आहे. निवडणूक आयोगाबाबत प्रश्न उपस्थित झाले. राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेते ही संसदीय लोकशाहीतली एक स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे ते मांडत असलेल्या आक्षेपांची नोंद संबंधित संस्थेनं घेतली पाहिजे”, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, आयोगावर टीका करतानाच शरद पवारांनी भाजपावरही टीका केली. “आज काय घडतंय, तर राहुल गांधींनी निवडणूक आयोगासंदर्भात टीका-टिप्पणी केली की त्याचं उत्तर आयोग देत नाही तर भाजपाचे नेते देतात. हा विषय भाजपाचा नाही. हा विषय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. पण आयोग राहिला बाजूला आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे सहकारी या आरोपांची उत्तरं देत आहेत. याचा अर्थ निवडणूक आयोगासंबंधी अविश्वास वाढायला ते मदत करत आहेत. ही गोष्ट चांगली नाही”, अशा शब्दांत शरद पवारांनी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं.
बिहार SIR बाबतचे निर्णय वास्तवाला धरून हवेत – शरद पवार
राहुल गांधींच्या खळबळजनक दाव्यांमुळे एकीकडे निवडणूक आयोग टीकेच्या केंद्रस्थानी असताना दुसरीकडे बिहारमध्ये राबवण्यात येत मतदार विशेष फेरतपासणीवरूनही (SIR) आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं.
“एकतर निवडणूक आयोगाने एसआयआरसंदर्भात टाकलेली पावलं वास्तवतेवर आधारित हवीत, त्याचा सखोल अभ्यास हवा. याद्यांमध्ये नावं समाविष्ट करणं किंवा कमी करणं या उद्योगांमुळे निवडणूक आयोगासंदर्भात जनमानसात अविश्वास निर्माण होत आहे. हे टाळलं पाहिजे. या विश्वासाला आजपर्यंत कधी धक्का लागला नाही. याचवेळी हे चित्र दिसतंय. त्याचे परिणाम चांगले नाहीत याची नोंद निवडणूक आयोगाने घेणं गरजेचं आहे”, असा इशारा शरद पवारांनी दिला.