देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचे मत..

राज्यात जातीय दंगली घडत असून जाती- जातीमध्ये संघर्ष कसा होईल हे चित्र बघायला मिळत आहे. या प्रवृत्तीमागे सत्ताधाऱ्यांची शक्ती आणि प्रोत्साहन मोठ्या प्रमाणावर आहे. हे देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. असे परखड मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते लोणावळ्यात बोलत होते.

शरद पवार म्हणाले, राज्यकर्त्यांनी सामाजिक एकता ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असते. पण धर्माच्या, जातीच्या नावावर समाजा- समाजात संघर्ष कसा होईल यासारखं चित्र बघायला मिळत आहे. या प्रवृत्तीमागे सत्ताधाऱ्यांची शक्ती आणि प्रोत्साहन मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे माणसांमध्ये, जाती- जातीमध्ये, धर्मा- धर्मामध्ये ज्या गोष्टी होत आहेत. त्या राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत. महाराष्ट्रात किती जातीय दंगली झाल्या याचा पाढा यावेळी शरद पवार यांनी वाचून दाखवला.

पुढे ते म्हणाले, दोन तीन जिल्ह्यात दंगली घडतात याचा अर्थ काय? आम्ही म्हणतो तीच भूमिका. समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करून काम करणारा एक मोठा वर्ग आहे. जाणीवपूर्वक संबंध राज्यात दूषित वातावरण होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. त्या वर्गापासून आपण सावध राहील पाहिजे. सर्वांनी एकत्र राहील तर यांना धडा शिकवणे अवघड नाही. ज्या गावात दंगल नव्हती तिथं दंगली घडत आहेत असेही पवार म्हणाले आहेत.