राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या शिंदे गट आणि भाजपा सरकारला लक्ष्य केलं आहे. शरद पवार यांना पुण्यामधील पत्रकार परिषदेत शिंदे सरकारच्या कारभाराविषयी प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना भाजपासंदर्भात सूचक इशारा; म्हणाले, “महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते…”

राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या सरकारच्या एकूण कारभाराकडे तुम्ही कसं पाहता? असा प्रश्न शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. या प्रश्नावर शरद पवार यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये उत्तर देताना, “मला कारभार काही दिसला नाही” असा टोला लगावला. पुढे बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यांवर खोचकपणे टीप्पणी केल्याचं पहायला मिळालं. “दोन महिन्यांमध्ये आपल्याला सरकारचा कारभार दिसला नाही पण (सरकार) गतीमान झालं आहे. राज्यप्रमुख गतीमान असून राज्य समजून घ्यासाठी फिरत आहेत,” असं पवार यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: “हा निर्णय बदलावा, प्रकल्प महाराष्ट्रात आणावा असं म्हटलं जातंय पण…”; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

याशिवाय राज्यामध्ये सध्या सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष या वादाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प तळेगावऐवजी गुजरातल्या गेल्याच्या प्रकरणावरुनही पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना शाब्दिक चिमटा काढला. “मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या दोघांनीही मागच्या सरकारच्या काळात या प्रकल्पासंदर्भात निर्णय घेतला नाही असं म्हटलं. त्यासाठी उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे असं हे मंत्री म्हणाले. मात्र उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत मंत्री होते. ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते. हे दोघे ज्या मंत्रिमंडळात होते, त्या मंत्रीमंडळाने दुर्लक्ष केल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. मला वाटतं हे शहाणपणाचं लक्षण नाही,” असा टोला शरद पवारांनी शिंदे आणि सामंत यांना लगावला.