शरद पवार यांची टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऊसशेती काही उद्योगपतींची नाही, तर शेतकऱ्यांचीच आहे. दरासाठी ऊसतोड रोखण्याचा उद्योग करणारी मंडळी शेतकऱ्यांच्याच मुळावर उठली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरुवारी कुंडल येथे केली.

शेतकऱ्याला ऊसशेतीतून हक्काचे पसे मिळतात. मात्र, या उत्पन्नाच्या मार्गात खोडा घालण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. दुधात मिठाचा खडा टाकण्याचा हा उद्योग संबंधितांनी बंद करावा, असा सल्ला पवार यांनी दिला. कारण ऊसशेती ही शेतकऱ्यांची आहे. टाटा-बिर्लासारखे उद्योगपती ऊस पिकवीत नाहीत. उसाची तोड रोखली तर यामध्ये शेतकऱ्याचेच नुकसान होणार आहे. हे शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलनाची दहशत निर्माण करणारे शेतकऱ्यांचेच नुकसान करीत असून दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम कोणी करू नये.

भाजपवर टीका करताना पवार म्हणाले, की देशातील काळ्या पशाचे भांडवल करून या पक्षाने मते घेतली. चमत्कार घडेल आणि बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा केले जातील, अशा भाबडय़ा आशेवर लोकांनी भाजपला मतदान केले. आजही लोक याकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र हा ‘चुनावी जुमला’ होता, असे सांगून एका झटक्यात सामान्यांचा भ्रमनिरास करण्यात आला. नोटाबंदीचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले आहेत. रोजगाराची संख्या कमी झाली असून बाजारात मंदी आली आहे. लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. याचे परिणाम समाजाच्या सर्व घटकांवर झाले आहेत. मात्र शासन हे मान्य करायला तयार नाही. शासनाने नोटाबंदी करीत असताना काळा पसा बाहेर येईल, दहशतवादी कारवाया थांबतील, असे सांगितले. मात्र यापकी एकही उद्दिष्ट साध्य झाल्याचे दिसत नाही. एकाच वेळी नोटाबंदी केल्याने ८६ हजार कोटींच्या नोटा चलनातून बाजूला गेल्या. याचा फटका बाजाराबरोबरच उद्योग क्षेत्रालाही बसला आहे.

‘शेतीकडे तरुण वळले तरच ती टिकेल’

शेती व्यवसायातून तरुण बाहेर पडत आहेत. शेती व्यवसाय आज उपजीविकेचा उरला नाही, अशी भावना तरुण वर्गात वाढीस लागत असून याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील. प्रत्येक कुटुंबातील एका तरुणाने शेतीकडे वळले पाहिजे, तरच शेती टिकेल. अन्यथा, आपण परावलंबी बनण्याचा धोका समोर दिसत आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on farmer movements
First published on: 03-11-2017 at 01:25 IST