देशभरात विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात एकजुट करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली. मात्र, वंचित बहुजन आघाडीला यात सहभागी करून घेतलं जात नसल्याचा आरोप करत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी सडकून टीका केली. “शिवसेना ठाकरे गट आणि आमचा साखरपुडा झाला आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन भटजी आमचं लग्न होऊ देत नाही,” असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (१२ ऑक्टोबर) अकोल्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सांगतो. आमचं धोरण असं आहे की, भाजपाच्याविरोधात जेवढ्या शक्ती एकत्र येऊ शकत असतील त्यांना किमान समान कार्यक्रमावर एकत्र आणलं जाईल. याआधी काय झालं आहे याचा विचार न करता त्या सर्वांना सहभागी करून घ्यायला हवं.”
“वंचित बहुजन आघाडीलाही इंडिया आघाडीत सहभागी करावं”
“वंचित बहुजन आघाडीलाही इंडिया आघाडीत सहभागी करावं, असं आम्हा लोकांचं मत आहे. मात्र, हा निर्णय एकटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊ शकणार नाही. बाकीच्या लोकांनाही विश्वासात घ्यावं लागेल,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
“वंचितला सहभागी करून घेण्यासाठी विलंब का होत आहे?”
वंचितला सहभागी करून घेण्यासाठी विलंब का होत आहे, असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, “आमची बैठकच झालेली नाही. इंडियाची बैठक होणार आहे. मुंबईनंतर आता नागपूरला बैठक घ्यावी अशी चर्चा सुरू आहे. बैठक कुठे घ्यायची तो निर्णय या आठवड्यात होईल. एकदा बैठक ठरली की, तेथे हा विषय घेता येईल.”
“इंडियाच्या पुढील बैठकीला प्रकाश आंबेडकर असणार आहेत का?”
इंडियाच्या पुढील बैठकीला प्रकाश आंबेडकर असणार आहेत का? यावर शरद पवार म्हणाले, “इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीला प्रकाश आंबेडकर असणार आहेत की नाही हे मी आज सांगू शकत नाही. कारण तो इंडिया आघाडीने निर्णय घ्यायचा आहे. इंडिया आघाडीत एकूण २४ पक्ष आहेत.”
हेही वाचा : “सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
“काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोन भटजी आमचं लग्नच होऊ देत नाही”
काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोन भटजी आमचं लग्नच होऊ देत नाहीये, तारीखच काढत नाही, या प्रकाश आंबेडकरांच्या आरोपावरही पवारांनी उत्तर दिले. शरद पवार हसत म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांचे आमच्यावरील आरोप हे आमच्यासाठी नवे नाहीत. या फार जुन्या गोष्टी आहेत. मात्र, आम्ही या गोष्टीचा विचार करत नाही. कारण व्यापक राष्ट्रीय हितासाठी ज्या शक्ती एकत्र येतात त्यांचा विचार करावा असा आमचा आग्रह आहे, पण हा निर्णय सामूहिकपणे होईल.”
