राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथे एका आयोजित सभेत बोलताना एक विधान केले होते. त्यांच्या त्या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उटली होती. “मतदान यंत्राची बटणे कचाकचा दाबा म्हणजे निधी द्यायला बरे वाटेल’, असे अजित पवार म्हणाले होते. आता अजित पवार यांच्या या विधानावरुन शरद पवार यांनी नाव न घेता खोचक टोला लगावला आहे.

शरद पवार काय म्हणाले?

“आपल्याला मनापासून काम करायचे आहे. काम करायचे असेल तर तुतारीच्या समोरचे बटन दाबा. काल कुणीतरी सांगितले की कसे दाबा म्हणून आता मी ते सांगत नाही. सांगताना हेही सांगितले की असे बटन दाबले तर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही”, असा खोचक टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावला.

हेही वाचा : अजित पवारांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान : म्हणाले, “राहुल गांधींचे ‘खटाखट’, तर माझे ‘कचाकचा’…”

अजित पवार काय म्हणाले होते?

“आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल. मात्र, जेव्हा तुम्हाला फायदा होईल, तेव्हा तो कुणामुळे झाला हे विसरु नका. विकासाच्या कामांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ. पण जसे आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो. तसे मतदान यंत्राची बटणे कचा कचा दाबा, म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल, नाहीतर माझा हात आखडता येईल”, असे अजित पवार म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानानंतर अजित पवारांचे स्पष्टीकरण

अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. त्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिली होते. ते म्हणाले, “कोणत्याही गोष्टीत ध चा मा करु नये. मी गंमतीने हसत हसत तिथे बोलत होतो. तिथे सर्वजण वकील आणि डॉक्टर होते. ती जाहीरसभा नव्हती. ती मर्यादित लोकांची, सुशिक्षित वर्गाची सभा होती”, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले होते.