पंढरपूर : मोदी संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करून हुकूमशाहीकडे निघाले आहेत, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. मोदी आश्वासने खूप देतात. मात्र त्याची अंमलबजावणी न करणे हे त्यांचे वैशिष्टय़ आहे अशी टीका त्यांनी केली. अकलूज येथे माढा लोकसभेचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला.
शरद पवार, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, शेकापचे जयंत पाटील यांची एक बैठक अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या बंगल्यात झाली. या वेळी या साऱ्यांचे स्वागत विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले. त्यानंतर पत्रकारांशी पवार यांनी संवाद साधला. यावेळी रघुनाथराजे निंबाळकर, माजी आमदार नारायण पाटील, धनाजी साठे आदी उपस्थित होते. या वेळी पवारांनी मोदींवर टीका केली. ईडी, सीबीआय अशा यंत्रणेचा गैरवापर मोदी यांनी केला. झारखंड, दिल्ली येथील मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले असे कधीच घडले नाही. त्यांनी चारशे पार ऐवजी ५४३ हा आकडा सांगावा अशी मिश्कील टीका पवारांनी केली.
हेही वाचा >>>माढ्यात नुकसान नियंत्रणासाठी देवेंद्र फडणवीस सरसावले, नाराज उत्तम जानकरांना विशेष विमानाने मुंबईत पाचारण
राज्यात यंदा अधिक जागा
पंतप्रधानांची भाषणे अप्रतिष्ठा करणारी आहेत. ते आश्वासने भरपूर देतात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही असेही पवार म्हणाले. यंदा यामध्ये किती तरी पटीने वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या १६ एप्रिल रोजी सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील हे एकत्र अर्ज दाखल करणार आहेत.