परभणी : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय पटलावर पुढे काय बदल संभवतील याची चर्चा सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जिंतूर- सेलू मतदारसंघात भारतीय जनता पक्षासोबत त्यांचे संबंध कसे राहतील याबाबत मोठी उत्सुकता आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भांबळे यांनी जिंतूरची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. या मतदारसंघातून भाजपच्या श्रीमती मेघना साकोरे- बोर्डीकर या विजयी झाल्या. आता भांबळे यांनी मंगळवारी (दि.१) अजीत पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून भांबळे यांच्या राजकारणाची सुरुवात झालेली आहे.
तब्बल दोन दशकांपासून दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. पुढे मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्याही विरोधात भांबळे यांनी निवडणूक लढवली. पराभवानंतर भांबळे हे पर्यायाच्या शोधात होते. त्यातल्या त्यात विरोधी पक्षात राहण्याऐवजी सत्ताधारी पक्षात जाण्याचा त्यांचा कल होता. भांबळे यांचे काही कार्यकर्ते यापूर्वीच अजीत पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते.
मंगळवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भांबळे यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख मनीषा केंद्रे, प्रेक्षा भांबळे- बोराडे, मुरलीधर मते, विश्वनाथ राठोड, अजय चौधरी, रामराव उबाळे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यात भाजपसोबत हा पक्ष सत्तेत असला तरी जिंतूर- सेलू मतदारसंघात बोर्डीकर, भांबळे यांच्यातला संघर्ष खूप जुना आहे. मतदार संघात परस्परांचे राजकीय विरोधक असलेल्या या दोन नेत्यात आता भांबळे यांच्या पक्षप्रवेशानंतर मतदारसंघातील समीकरण कसे असेल याबाबत उत्सुकता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवून आपापली ताकद निश्चित करण्याचे संकेत महायुतीतल्या पक्षांनी आपापल्या स्थानिक नेत्यांना दिले आहेत. महायुतीतल्या तिन्ही पक्षांना प्रत्येकच मतदारसंघात आपले कार्यकर्ते सांभाळायचे असल्याने गेल्या तीन महिन्यापासून जिल्ह्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीतल्या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘प्रवेश’ सुरू आहे. नजिकच्या काळात या तिन्ही पक्षात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या माध्यमातून मोठा सत्ता संघर्ष होईल, असे मानले जात आहे.