निवडणूक प्रचारास आलेल्या केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री अंबाजोगाईत मुक्काम करून परळी ते आष्टी असा गारपीटग्रस्त भागात पाहणी दौरा केला. भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनीही परळीपासून माजलगावपर्यंत गारपिटीने बाधित गावांत जाऊन शेतकऱ्यांचे सांत्वन केले. परस्परांचे कट्टर विरोधक असलेल्या दोन्ही लोकनेत्यांनी एकाच दिवशी गारपीटग्रस्तांना भेट देत राजकीय ‘लक्ष्य’ साधत एकमेकांना चितपट करण्याचा प्रयत्न केला. पवार-मुंडे हे दोन्ही नेते जिल्हय़ात एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरण्याची ही बहुधा पहिलीच वेळ. आठ दिवसांच्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा उठला असताना सांत्वनाच्या पडद्याआड मात्र पुढाऱ्यांचा मतावर असलेला डोळा लपून राहिलेला नाही.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने राज्यमंत्री सुरेश धस यांना मदानात उतरवले. त्यानंतर प्रचाराची जोरदार सुरुवात झाली. शरद पवार यांनी सूत्रे हातात घेऊन बीडला प्रचारसभा निश्चित केली. मात्र, शनिवारपासूनच गारपिटीचा तडाखा बसल्याने भानावर आलेल्या सर्वच नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांत्वन करण्यास सुरुवात केली. शरद पवार यांनी रविवारी सायंकाळीच परभणीहून अंबाजोगाईत येऊन दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या निवासस्थानी मुक्काम केला व मध्यरात्रीपर्यंत जिल्हय़ातील राजकीय आढावा घेत मोच्रेबांधणीही केली. याच वेळी भाजपचे खासदार मुंडे यांचेही बीड शहरात आगमन झाले. त्यांनीही काही खास लोकांच्या भेटी घेत जमवाजमव करीत परळीत मुक्काम केला.
सोमवारी सकाळी पवार यांनी माजी आमदार बाबूराव आडसकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी रमेश आडसकर, मेघराज आडसकर यांच्यासोबत चहापान केले. त्यानंतर अंबाजोगाई तालुक्यातील िपपळा धायगुडा, वरवटी या गावच्या शिवारात गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करून परळी गाठली. आमदार धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पंडितराव मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करून मुंडेंच्या घरी न्याहारी केली आणि बांधा-बांधावरचा दौरा सुरू झाला. तलाठी पंचनामा करायला आले होते का? किती शेती आहे, असे प्रश्न विचारत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मांडवा, मिरवट, चांदापूर, टोकवाडी, पांगरी, िलबोटा, सफरदाबाद, कवडगांव, साबळा, सिरसाळामाग्रे वडवणी तालुक्यातील सोन्नाखोट्टा येथे भेट देऊन सायंकाळी बीडमाग्रे आष्टीकडे रवाना झाले. या वेळी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, उमेदवार सुरेश धस व जिल्हय़ातील सर्व आमदार त्यांच्यासोबत होते. पवार यांच्या गाडीचे सारथ्य आमदार धनंजय मुंडे करताना दिसले.
दुसऱ्या बाजूला सोमवारी सकाळपासूनच परळी तालुक्यातून भाजपाचे खासदार मुंडे यांनीही गारपीटग्रस्त भागात दौऱ्याला सुरुवात केली. साडेअकराच्या सुमारास पांगरी येथून पवारांचा ताफा जाता िलबोटा येथे मुंडेंचे आगमन झाले. या वेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस फुलचंद कराड यांनी मुंडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी जोरदार घोषणाबाजीही झाली. मुंडे यांनीही सिरसाळा-तेलगाव माग्रे माजलगाव तालुक्यातील सावरगाव, पायतळवाडी, किटी अडगाव, राजेगांव, बारावती तंडा, एकदरा, माळीवाडा, तालखेड या अनेक गावांमध्ये भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीच्या मदानात मुंडे व शरद पवार कट्टर विरोधक आहेत. मुंडेंना पराभूत करण्यासाठी पवारांनी जोरदार मोच्रेबांधणी केली आहे. या पाश्र्वभूमीवर सोमवारी प्रथमच एकाच दिवशी राज्यातील हे दोन्ही दिग्गज नेते गारपीटग्रस्त भागात बांधाबांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेत होते. पवारांसमोर जिल्हा, मराठवाडय़ातील आमदार व मंत्र्यांचा ताफा होता. अंबाजोगाई ते आष्टीपर्यंत पवारांनी दिवसभर जोरदार ‘रोड शो’ केला, तर मुंडेंनीही परळीपासून माजलगाव आणि सायंकाळी बीडपर्यंत भेटीगाठी घेत ‘रोड शो’नेच उत्तर देण्याचा प्रयत्न केला. गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पोटात गोळा उठलेला असताना दोन दिग्गज नेत्यांसह जिल्हय़ातील नेत्यांनीही सांत्वनाच्या पडद्याआड राजकीय मतांची पोळी भाजण्याचा प्रयत्न केल्याचेच यातून दिसत होते.
आडसकरांच्या घरी चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून असलेले व मागील लोकसभा निवडणुकीत सव्वाचार लाख मते घेतलेले रमेश आडसकर पक्षाकडून योग्य सन्मान मिळत नसल्यामुळे नाराज असल्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर शरद पवार यांनी सोमवारी सकाळी थेट आडस येथे जाऊन माजी आमदार बाबूराव आडसकर, त्यांचे पुत्र रमेश आडसकर यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2014 रोजी प्रकाशित
गारपीटग्रस्तांसाठी पवार-मुंडे बांधाबांधावर!
प्रचारास आलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंबाजोगाईत मुक्काम करून परळी ते आष्टी असा गारपीटग्रस्त भागात पाहणी दौरा केला. भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनीही परळीपासून माजलगावपर्यंत गारपिटीने बाधित गावांत जाऊन शेतकऱ्यांचे सांत्वन केले.

First published on: 11-03-2014 at 01:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar gopinath munde hailstorm affected people survey