निवडणुकीदरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीतील परस्पर सामंजस्य व आघाडीच्या धर्माची वारंवार आठवण करून दिली जात असताना परभणीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमात आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवली. विशेष म्हणजे ज्या गारपीटग्रस्त गावाला पवारांनी भेट दिली, तेथे मात्र बोर्डीकरांची उपस्थिती होती.
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भांबळे यांचा पराभव बोर्डीकरांनी केला. जिंतूर विधानसभा मतदारसंघात भांबळे यांनी काँग्रेस उमेदवार बोर्डीकर यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली. दोघांचेही राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात बोर्डीकर-भांबळे संघर्ष टोकाचा राहिला. बोर्डीकर यांच्या विरोधात भांबळे यांना उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी बळ दिले. बोर्डीकर यांच्या विरोधात गेल्या ५ वषार्ंपासून भांबळे यांनी विरोधाची धार तीव्र केली. जिंतूर विधानसभा मतदारसंघात दोन्ही बाजूंनी टोकाची गटबाजी आहे. गावपातळीवरही दोन्ही गटांत हा संघर्ष मोठय़ा प्रमाणात आहे.
बोर्डीकर यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यात येऊन अनेकदा तोफ डागली, तर बोर्डीकरांनीही अजित पवारांना काळे झेंडे दाखवून संतप्त भावना नोंदवल्या. जिल्हा बँकेच्या प्रकरणात भांबळे यांनी बोर्डीकरांवर जोरदार टीका केली होती. विशेषत: या दोघांमध्येही सतत धुमसणाऱ्या संघर्षांची झळ अनेकदा जिंतूर मतदारसंघात शासकीय कर्मचाऱ्यांना वारंवार बसली. भांबळे राष्ट्रवादीचे उमेदवार असले व सर्वत्र काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असली, तरीही बोर्डीकर मात्र भांबळे यांच्या कट्टर विरोधातच आहेत.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जिल्ह्याच्या गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणीत बोर्डीकर यांच्या मतदारसंघातील झोडगावचा समावेश होता. पवार झोडगावला गेल्यानंतर बोर्डीकरही त्यावेळी आवर्जून उपस्थित होते. या गावी बोर्डीकरांची पवारांशी भेट झाली. झोडगावहून पवार थेट परभणीतील मेळाव्यास आले. या मेळाव्याला मात्र बोर्डीकरांची गरहजेरी प्रकर्षांने जाणवली. एकीकडे व्यासपीठावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत परस्पर सहकार्याची भावना व्यक्त होत असताना दुसरीकडे ही विसंगती ठळकपणे जाणवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar hailstorm survey mla bordikar meeting absent
First published on: 10-03-2014 at 03:46 IST