राज्यासह देशभरात सुरु असलेल्या लाऊडस्पीकरच्या वादावरुन सर्वत्र राजकीय वातावरण तापलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यांनंतर या वादाला आणखी तोंड फुटले आहे. अशातच राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत लाऊडस्पीकरच्या मुद्द्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 “रामदास स्वामींकडे तुम्ही आता जातीने बघणार आहात? रामदास स्वामी कधी म्हणाले होते का ते शिवाजी महाराजांचे गुरु आहेत म्हणून. गुरु शिष्याच्या नात्याचा कधी संबंध येत नाही. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांविषयी जे लिहिलं आहे त्याच्याइतके उत्कृष्ट लिहिलेल कुठंही वाचलेलं नाही. रामदास स्वामींनी लिहिलेल्या ओळींमध्ये ते छत्रपतींना क्षमा केली पाहिजे असे सांगतात. हे मी लिहिले आहे मला माफ करा असे त्यांनी म्हटले आहे. कुठच्या शाळेतील शिक्षक असे लिहितो. मी इतकी वर्षे शिकलो मला आठवत नाही कुठल्या शिक्षकाने माझी माफी मागितली. ही माफी नाहीये प्रेम आहे,” असे राज ठाकरे म्हणाले.

“शरद पवारांना हिंदू या शब्दाची मुळात अ‍ॅलर्जी आहे. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहेच पण त्याआधी आमच्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले आहेत. पण शरद पवारांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी ऐकले नाही. राष्ट्रवादीच्या सभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही नसायचा. शरद पवार साहेब मी जात मानत नाही. कोणत्या ब्राम्हणांची बाजू घेण्यासाठी मी उभा नाही आणि कोणाचीच बाजू घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्या अठरापगड जातींमध्ये तुम्ही विष कालवले. मतांसाठी कालवले विष शाळा कॉलेजपर्यंत गेले आहे. शाळेत मुले एकमेकांच्या जातीविषयी विचार करु लागली आहेत. यासाठी महाराष्ट्र दिवस साजरा करायचा का?,” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

“शरद पवार सांगतात दोन समाजात दुही माजवत आहेत. हे देशासाठी, राज्यासाठी चांगलं नाही. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत त्याने दुही माजत आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतून पाहायचं. हातात पुस्तक घेतल्यानंतर आधी लेखक पाहायचा. शरद पवार नास्तिक आहे असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग मंदिरांमधील फोटो यायला लागले,” असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar has an allergy to the word hindu raj thackeray abn
First published on: 01-05-2022 at 21:38 IST