Ajit Pawar On Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांचं कारण म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे अनेकदा एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांच्यात संवादही झाला होता, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं. दरम्यान, या चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

‘भाजपाबरोबर गेलेल्या संधीसाधूंना आपण बरोबर घेणार नाहीत’, असं स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडलं आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर पडदा पडला आहे. मात्र, शरद पवार यांनी ही भूमिका मांडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर फक्त चार शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे’, अशी मोचक्या शब्दांत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

आज शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील मेळाव्यात बोलताना पक्षाची आगामी वाटचाल आणि संभाव्य युती कुणाबरोबर असेल किंवा विशेष करून कुणाबरोबर नसेल यावर भाष्य केलं. शरद पवार यांनी म्हटलं की, “एक नवी नेतृत्वाची फळी आपल्याला तयार करावी लागेल. या नेतृत्वाच्या माध्यमातून विकासाचे काम करायचं आहे. येथील नगरपालिका, मनपा अनेक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होती. मध्यंतरी काही गडबड झाली आणि भाजपाची सत्ता आली. मात्र, आता कोण आला, कोण गेला याचा अजिबात विचार करू नका. जनता शहाणी आहे. या देशाची लोकशाही आमच्यासारख्या नेत्यांमुळे नाही तर सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाणपणामुळे टिकली आहे. आताच कुणीतरी भाषण करताना म्हटलं की, तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या. पण सगळे म्हणजे कोण?”, असं शरद पवार यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार पुढे म्हणाले की, “हे सगळे म्हणजे गांधी-नेहरू-चव्हाण यांचा विचार, फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार माननारे असतील तर मला मान्य आहे. पण सत्तेसाठी भाजपाबरोबर जाऊन बसणारे लोक असतील तर ते काँग्रेसचा विचार माननारे नाहीत. कुणाशीही संबंध ठेवू पण भाजपाशी संबंधित असलेले लोक काँग्रेसच्या विचारांचे असू शकत नाहीत. त्यामुळे अशा संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.