Sharad Pawar on PM Modi Retainment : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. मात्र २०२४ पासून पंतप्रधान मोदी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यानंतर निवृत्त होतील, अशी चर्चा सुरू होत्या. इतकेच नाही थर भाजपामध्ये ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या नेत्यांना बाजूला सारून नव्या नेतृत्वाला संधी, असा भाजपात नियम असल्याचे मानले जाते. यानंतर नरेंद्र मोदी हे राजकारणातून निवृत्ती घेणार रा? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी भाष्य केले आहे. शरद पवार कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलत होते.

नरेंद्र मोदींच्या ७५ व्या वाढदिवसाबद्दल बोलताना शरद पवारांनी त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींचा ७५ वा वाढदिवस झाला. हा दिवस कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मी देखील त्यांना पत्र लिहिलं, अभिनंदन केलं. आम्ही सगळे जण यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात वाढलेले लोक आहोत. अशा प्रसंगांमध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणत नाही. अनेकांनी, देशातील आणि देशाबाहेरील नेतृत्वांनी मोदींना शुभेच्छा दिल्या त्या योग्यच आहेत. माझा ७५ वा वाढदिवस होता त्यावेळी मोदी स्वतः आले होते. त्यावेळी त्यांनीही राजकारण आणलं नाही आम्हीही आणू इच्छित नाही.

निवृ्त्ती बद्दलच्या चर्चेंबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, मी ७५ व्या वर्षानंतर मी थांबलो नाही त्यामुळे पंतप्रधानांनी थांबावं हे सांगायचा मला नैतिक अधिकार नाही. मी ८५ वर्षांचा आहे, असे शरद पवार म्हणाले.शरद पवारांनी यावेळी अतिवृष्टीमुळे राज्यभरात झालेल्या नुकसानीबाबत देखील भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये आरोग्य तपासणी, स्वच्छता मोहीम, प्रदर्शन, जनजागृतीसह विकासविषयक उपक्रम राबवण्यात आले. तसेच भाजपकडून देशभरात बुधवारपासून सेवा पंधरवड्यास सुरूवात करण्यात आली.

मोदींच्या वाढदिवसानिमीत्त राज्य आणि देशासह जागतिक नेत्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या. माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दूरध्वनीवरून उत्तम संभाषण झाले. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते फार उत्कृष्ट काम करत आहेत. नरेंद्र, रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी केलेल्या मदतीसाठी आभार! अशा शुभेच्छा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या. तर रशिया आणि भारतादरम्यानचे संबंध दृढ करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्तिश: मोठे योगदान दिले. राष्ट्रप्रमुख म्हणून तुम्ही तुमच्या समकक्षांकडून मोठा आदर आणि जागतिक पातळीवर अधिकार मिळवला आहे , असे रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणले.