देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं आज तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले. अपघातात सीडीएस बिपीन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. या भीषण दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लष्करी अधिकाऱ्यांसह बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा देखील समावेश आहे. या भीषण दुर्घटनेवर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “ही अत्यंत धक्कादायक अशाप्रकारची बातमी आहे. एका दृष्टीने देशाचा लष्करप्रमुख आणि त्याच्यासोबत काही वरिष्ठ अधिकारी यांना या पद्धतीचा मृत्यू येणं. ही अतिशय चिंताजनक अशाप्रकारची गोष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे जे हेलिकॉप्टर वापरलं ते अतिशय उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर होतं. त्या हेलिकॉप्टरचा एकंदर दर्जा याबद्दल काही चर्चा होऊ शकत नाही. मात्र केवळ मशीन चांगलं असून चालत नाही, परिस्थिती देखील कशी आहे याकडे दुर्लक्ष करता येत नाही. ”

IAF Chopper Crash : देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन

तसेच, “माझा व्यक्तिगत एक अनुभव आहे. मी मुख्यमंत्री असताना एका दिवशी पुण्यावरून मुंबईला हेलिकॉप्टरने चाललो होतो आणि पुणे-मुंबई रस्त्यात खंडाळा-लोणावळा हा जो परिसर आहे. तिथे एक मोठी दरी आहे. त्या दरीतून आम्ही प्रवास करत असताना, अतिशय ढग होते, सोसाट्याचा वारा होता. पुढचं काही दिसेना आणि आजुबाजुला जंगल होतं. त्यावेळी आमचा पायलट देखील गडबडला. कुठे हेलिकॉप्टर जाईना, पुढचं काही दिसेना. तातडीने एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की आजुबाजुला जो डोंगरी भाग आहे. जर इथे कुठे आदळलं तर हा शेवटच. पण मला महाराष्ट्राची भौगोलिक माहिती आहे, त्यामुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त उंच ठिकाण कळसूबाई शिखर आहे, की जे पाच हजार फुटांचं आहे. मी पायलटला सांगितलं की सात हजार फुटावर तू हॅलिकॉप्टर घे आणि सात हजार फुटावर गेल्यामुळे आम्ही तिथून बाहेर पडलो.” असा किस्सा देखील शरद पवारांना माध्यमांना सांगितला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar reacts to helicopter crash in tamil nadu msr
First published on: 08-12-2021 at 19:01 IST