शरद पवार मोठे नेते आहेत. ते दहा वर्ष कृषीमंत्री होते. त्यावेळीही कांद्याबाबत अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, संकटकाळात त्यांनी कांद्याबद्दल निर्णय घेतला नाही, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला होता. याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेत बोलत होते.

केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा २४१० प्रतिक्विंटल भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. तर, शरद पवारांनी ४ हजार प्रतिक्विंटल भाव कांद्याला देण्याची मागणी केली होती. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं होतं.

हेही वाचा : हसन मुश्रीफांच्या ‘त्या’ टीकेला रोहित पवारांचं थेट दसरा चौकातून प्रत्युत्तर; म्हणाले, “मी राजकारणात…”

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“शरद पवार मोठे नेते आहेत. ते दहा वर्ष कृषीमंत्री होते. त्यावेळीही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, संकटकाळात कांद्याबाबत असा निर्णय घेतला नाही. जेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट आलं, तेव्हा पंतप्रधान मोदी पाठिशी उभे राहिले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. त्यामुळे यात राजकारण करू नये,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.

“मी कांद्यावर कर लावला नाही”

यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी म्हटलं, ‘शरद पवार कृषीमंत्री असताना कांद्यासाठी केलं?’ मी कृषीमंत्री असताना कांद्यावर कधी कर लावला नाही. कांदा विदेशात जाईल, याची काळजी घेतली. एकदिवशी कांद्याच्या किंमती वाढल्या, तेव्हा भाजपावाले संसदेत गळ्यात कांद्याची माळ घालून आले. मला सभापतींनी विचारलं, तुमचं यावर उत्तर काय? मी त्यांना स्पष्ट सांगितलं, जिरायत शेतकरी कांदा पिकवतो. कांदा पिकवल्यानंतर दोन पैसे मिळत असतील, त्यांना सन्मानाने जगता येत असेल, तर मी शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणार.”

हेही वाचा : “ईडीची भीती अन् धाक मलाही दाखवला, पण…”, अनिल देशमुखांचं कोल्हापुरात मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…अन् त्यानंतर कोणीही तोंड उघडलं नाही”

“तुम्ही कांद्याच्या माळा घाला किंवा कवड्याच्या माळा घाला. शेतकऱ्यांची रक्कम कमी होऊन देणार नाही. शेतकऱ्याला मिळणाऱ्या किंमतीपेक्षा अधिक किंमत कशी मिळते, याकडे माझे लक्ष राहिलं. त्यानंतर कोणीही तोंड उघडलं नाही,” असं शरद पवारांनी सांगितलं.