लोकसत्ता वार्ताहर
सावंतवाडी : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बॅरिस्टर नाथ पै यांच्या देशहिताच्या कार्याला सलाम केला. “संसदपटू बॅरिस्टर नाथ पै माझे आदर्श आहेत. त्यांनी देशाची प्रतिष्ठा वाढविण्याचे कार्य केले. संसदेत त्यांना ऐकण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू थांबत,” अशा आठवणी जाग्या करत पवार यांनी नाथ पै यांच्या कार्याचे कौतुक केले.
वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्राला भेट दिल्यानंतर बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्रामध्ये बोलताना पवार यांनी प्रा. मधु दंडवते आणि क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. “क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुनील गावसकर यांचे वडील आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी गप्पा मारायला मी वर्ष-दोन वर्षांनी वेंगुर्ले येथे यायचो. या ठिकाणी असलेल्या फळसंशोधन केंद्राने देखील शेतकरी व ग्राहकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे,” असे पवार म्हणाले.
पवार यांनी आपल्या ५७ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत सांगितले की, “मला लोकांनी कधी घरी बसवलेले नाही.” वेंगुर्ले येथील निसर्गरम्य स्थळाचे वर्णन करताना त्यांनी बॅरिस्टर नाथ पै आणि प्रा. दंडवते यांच्या कार्याचा गौरव केला. “माझे आदर्श बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव घेतलेच पाहिजे. एकदा नाथ पै संसदेत बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जात होते. पण, नाथ पै बोलणार म्हटल्यावर ते परत आले आणि त्यांना ऐकण्यासाठी बसले,” असे पवार म्हणाले.
वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्राच्या कार्याचे कौतुक करताना पवार म्हणाले, “आंबा, काजू यांच्यावर संशोधन बाबतही मी माहिती घ्यायचो. फळ संशोधन केंद्राने ऐतिहासिक असे काम केलेले आहे. शेतकरी व ग्राहकांना या केंद्रातून मदत होत आहे.”
कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे कोकणात फलोद्यान योजना राबवली गेली, असे सांगितले. उद्योगपती अवधूत तिंबलो यांनी शरद पवार यांच्या काही आठवणी सांगितल्या. आदिती पै यांनी शरद पवार यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. या कार्यक्रमात सचिन वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले, तर उमेश गाळवणकर आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,व्हिक्टर डान्टस, अमित सामंत, प्रसाद रेगे तसेच मान्यवर उपस्थित होते.