राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या महिन्यात मोठी फूट पडली. अजित पवार यांनी पक्षातल्या ३० पेक्षा जास्त आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला तसेच त्यांनी आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे. अजित पवार यांनी या गटासह महायुतीत प्रवेश केला आहे तसेच ते सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत. तर त्यांच्याबरोबर गेलेल्या राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना मंत्रीपदं मिळाली आहेत. या बंडखोर आमदारांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार आज पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार म्हणाले, ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) कारवाईच्या भितीने आपल्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला आणि आज ते भाजपाच्या बाजूला जाऊन बसले आहेत. ते सांगतात ‘आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहोत. आम्ही आमची वैचारिक भूमिका बदलली नाही’. परंतु, फक्त तुरुंगात जावं लागू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राजकारणात किंवा समाजकारणात सत्याची कास सोडून कोणीतरी असं वागत असेल तर माझी खात्री आहे की आज ना उद्या अशा भेकड प्रवृत्तीच्या लोकांना सामान्य जनता वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही. त्यांना पुढे अडचण झाल्याशिवाय राहणार नाही.

हे ही वाचा >> दादा भुसे आणि आदित्य ठाकरेंची नाशकात गुप्त भेट? जयंत पाटील म्हणाले, “सगळीच माणसं आपल्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार म्हणाले, सध्या आपल्या राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. राज्यासमोर महागाई, बेकारी, वाढती गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किंमतीचा प्रश्न, उद्योगधंद्यांचे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. आपल्या राज्यातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत? राज्यातल्या अशा प्रत्येक प्रश्नासंदर्भात जनतेला आस्था आणि चिंता आहे. गेल्या सहा मिहिन्यात राज्यातले किती कारखाने गुजरातला गेले किंवा अन्य राज्यात गेले? तुम्ही गुजरातमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये कारखाने अवश्य काढा, परंतु जे कारखाने इथे येणार होते, महाराष्ट्रात येणार होते, ते तिकडे नेणं योग्य नाही. या कारखान्यांमुळे इथल्या तरुणांना कामाची संधी मिळणार होती. तो कारखाना तुम्ही इतर राज्यात नेला, त्यामुळे इथल्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या तरुणांचा रोजगार गेला, अशा प्रश्नांसंदर्भात आता आपण बोललं पाहिजे.