राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. शरद पवार म्हणाले, निलेश लंके संसदेत मराठीत काय बोलतील याचा भरवसा नाही. मी त्यांना सांगितलं आहे की, “आपण संसदेत मराठीत बोलू शकतो. लंके यांनी लोकांसाठी कामं केली आहेत, म्हणूनच त्यांना मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या बहुमताने विजयी केलं आहे. आता ते संसदेत जाऊन आपले प्रश्न मांडतील. तसेच मतदारसंघाचा विकास करतील. “

शरद पवार म्हणाले, “आपले निलेश लंके मोठ्या बहुमताने निवडून आले आहेत आणि आता ते लोकसभेत जात आहेत. परंतु, मला एका गोष्टीची काळजी वाटते की निलेश लंके संसदेत जातील त्यावेळी त्यांच्याबरोबर आपले संसदेतील काही जुने सदस्य देखील असतील, आपल्या जुन्या सदस्यांना तिथले लोक विचारतील हा कोण गडी या ठिकाणी आणला? मात्र आपले हे खासदार संसदेतही जोरदार भाषण करतील यात शंका नाही. मी निलेश लंके यांना सांगितलं आहे की संसदेत मराठीतही भाषण करता येतं. निवडणुकीच्या काळात कुणीतरी म्हटलं इंग्रजीत का बोलत नाही? मला त्यांना सांगायचं आहे की इंग्रजी बोलायला काही अडचण नाही. परंतु, संसदेत हिंदीत किंवा आपली मातृभाषा मराठीतही बोलता येतं.”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा म्हणाले, माईक एकदा का निलेश लंके यांच्या हातात आला की ते मराठीत काय बोलतील याचा भरवसा नाही. त्यांच्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. त्यामुळेच जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिलं आहे आणि आता ते संसदेत चांगलं काम करतील.

हे ही वाचा >> मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळांकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत निलेश लंके?

अत्यंत किरकोळ शरीरयष्टी, डोळ्याला काड्यांचा चष्मा, खुरटलेली काळी-पांढरी दाढी, कपाळावर टिळा, साधा शर्ट आणि पॅन्ट असा पेहराव, अशा एकदम सामान्य वेशभूषेतील निलेश ज्ञानदेव लंके यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या पोटात शिरण्याची आणि लोकांमध्ये मिसळण्याची विलक्षण हातोटी आहे. शिवाय तितक्याच कौशल्याने ते आधुनिक समाज माध्यमांचाही वापर करतात. या सामान्य कार्यकर्त्याने ग्रामपंचायतीचा सरपंच ते आमदार आणि आता खासदार अशी भरारी घेतली आहे. लंके यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे खासदार सुजय विखे यांचा २८ हजार मतांनी पराभव केला आहे. लंके यांना ६.२४ लाख मतं मिळाली आहेत, तर सुजय विखे यांना ५.९६ लाख मतं मिळाली आहेत.