राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट गेल्या वर्षभरापासून चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेप्रमाणेच हे प्रकरणही थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. न्यायालयाने घड्याळ या पक्षचिन्हाबाबत नुकतेच अजित पवार गटाला निर्देशही दिले आहेत. या सर्व चर्चा एकीकडे चालू असताना दुसरीकडे ही पक्षफूट म्हणजे शरद पवारांनी केलेली खेळी असल्याची टीकाही पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं राजकीय वर्तुळात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडतंय? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना त्यावर शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

काही दिवसांपूर्वी सरोज पाटील यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावेळी घडलेल्या घडामोडींवर भाष्य केलं होतं. बुधवारी त्यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवारांच्या बाबतीत भाजपावर गंभीर आरोप केले होते. “भाजपाला सुप्रिया सुळेंना पाडायचं आहे आणि सुनेत्राला निवडून आणायचं आहे. त्यामुळे शरद पवारांचा पराभव होईल असं त्यांना वाटतं. पण बारामतीत शरद पवारांनी केलेलं काम, लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत”, असं सरोज पाटील म्हणाल्या होत्या. त्यापाठोपाठ त्यांनी आज राष्ट्रवादीतील फुटीसंदर्भात मोठा दावा केला आहे.

काय म्हणाल्या सरोज पाटील?

सरोज पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना पवार कुटुंबात फूट पडलेली नाही, असं म्हटलं आहे. “लोकांनी चिंता करू नये. उगीच गट फुटला, पवार कुटुंबात फूट पडली अशी चर्चा करू नका. काही होत नाही. निवडणुका होतील. जे निवडून यायचे आहेत ते येतील. आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून घरात येतो. एनडी पाटील आणि शरद पवार हे दोन अत्यंत वेगळ्या डाव्या आणि उजव्या विचारसरणीचे लोक आहेत. पण कधीही आमच्या घरात राजकारण आलं नाही”, असं त्या म्हणाल्या.

“एवढं सुसंस्कृत कुटुंब आहे, काहीही होणार नाही”

“जेव्हा एनडी पाटील निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा माझ्या आईने त्यांना १० हजार रुपये दिले होते. पण आम्ही कधीच राजकारण घरात आणत नाही. शरद पवारांचं मी पाहिलं आहे. स्वत:च्या ताटापेक्षा बहिणींच्या ताटात सर्वकाही आहे का हे पाहतात. असं सुसंस्कृत कुटुंब असताना तिथे काहीही होणार नाही. मला तसं अजिबात वाटत नाही”, असंही सरोज पाटील यांनी नमूद केलं.

“भाजपाला वाटतं हा माणूस खलास केला की…”, सरोज पाटील यांचं शरद पवारांबाबतचं विधान चर्चेत; म्हणाल्या, “..म्हणून ते दगडं मारतायत!”

“अजित काय बोलला, श्रीनिवास काही बोलले तर ते राजकारणापुरते आहे. निवडणुका संपल्या की सगळे ढग निघून जातील”, असं विधान यावेळी सरोज पाटील यांनी केलं. या विधानावरून आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांच्या टीकेवर दु:ख

दरम्यान, अजित पवारांनी शरद पवारांवर पातळी सोडून टीका केल्याचं दु:ख वाटत असल्याचं त्या म्हणाल्या. “राजकीय पातळी सोडल्याचं दु:ख वाटतंय. पण आमच्या आईनं आम्हाला शिकवलंय की रडत बसायचं नाही. कसा तोल सुटतो हे मला कळत नाही. पण शरदच्या बाबतीत त्याच्या तोंडून जी काही भाषा आली, ते बोलता बोलता आलं असेल. कारण तो संवेदनशील आहे. आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला कदाचित पश्चात्ताप झाला असेल. पण या सगळ्याचं दु:ख नक्कीच झालं”, असं त्या म्हणाल्या.