भारताचं इशान्येकडील राज्य मणिपूर गेल्या तीन महिन्यांपासून धगधगतंय. दोन समाजांमधील संघर्षामुळे राज्यभर हिंसाचार सुरू आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. सुरुवातीला या प्रकरणाकडे केंद्र सरकारने गांभीर्याने घेतलं नव्हतं. परंतु, देशभरातून उसळलेला रोष आणि सर्वोच्च न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर सरकारकडून याप्रकरणी कारवाईला सुरुवात झाली. तसेच विरोधी पक्षांनी मणिपूरचा प्रश्न लावून धरला. हा प्रश्न विरोधी पक्षांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडला. त्यावर गृहमंत्री अमित शाह यांना बोलायला लावलं. तसेच सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला.

दरम्यान, मणिपूरमधील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्ष सातत्याने सरकारला धारेवर धरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील सातत्याने मणिपूर प्रश्नावर केंद्र सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) ‘स्वाभिमान सभा’ कोल्हापूरच्या दसरा चौकात पार पडत आहे. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मणिपूरचा मुद्दा मांडला.

शरद पवार म्हणाले, मणिपूरमध्ये दोन समाजांमध्ये सघर्ष सुरू आहे. तिथे आया बहिणींवर हल्ले होत आहेत. त्यांची विवस्त्र धिंड काढली जाते. त्यांना बेआब्रू केलं जातं. परंतु, ज्यांच्या हातात त्या राज्याची आणि देशाची सत्ता आहे, ते लोक या बहिणींना वाचवण्यासाठी सत्तेचा वापर करत नाहीत. संसदेत यावर चर्चा झाली, परंतु, ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) यावर बोलायला तयार नाहीत. अशी आपल्या देशातली स्थिती आहे. आया-बहिणींची इज्जत सांभाळण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाही त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. हे लोक सत्तेचा वापर फक्त विरोधकांना त्रास देण्यासाठी करतात.

हे ही वचा >> Chandrayan 3 : चांद्रमोहिमेच्या यशामागचे मराठमोळे हात, नांदेडच्या संशोधिकेचं ‘विक्रम’च्या लँडिंगमध्ये मोठं योगदान

शरद पवार यांची १७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा पार पाडली. बीडमधील सभेतही शरद पवार यांनी मणिपूरमधील हिंसाचारावर भाष्य केलं होतं. शरद पवार म्हणाले, देशभर कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही केंद्र सरकारची जबाबदारी असते. परंतु, सध्या मणिपूरची अवस्था काय आहे? मणिपूर, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश ही छोटी राज्यं असली तरी महत्त्वाची राज्यं आहेत. प्रत्येक राज्याच्या शेजारी पाकिस्तान तरी आहे किंवा चीन तरी आहे. या दोन्ही देशांची नजर चांगली नाही. संकट आलं तर काय होईल तिथून काय होईल यासाठी भारतीय लष्कराला सतर्क रहावं लागतं. मणिपूर हे सध्या अशांत आहे. आज मणिपूर पेटलं आहे. तिथल्या समाजा-समाजात भांडण सुरू आहे, त्यांच्यात अंतर पडलंय. एक वर्ग विरुद्ध दुसरा वर्ग असा तिढा निर्माण झाला आहे. तिथे हल्ले होत आहेत, उद्योग नष्ट केले जात आहेत. स्त्रियांची धिंड काढली जातेय, हे सगळं होत असताना देशात बसलेलं भाजपाचं सरकार कुठल्याच प्रकारची पावलं टाकत नाही.