शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सरकार स्थापन करण्यास अंतिम टप्प्यात असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपाने सरकार स्थापनेचा दावा केला. त्याचबरोबर शनिवारी सकाळी राजभवनात शपथविधीही पार पडला. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. शुक्रवारी रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये स्थापन होईल, असे चित्र दिसत असतानाच अचानक शनिवारी सकाळी राज्यात भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीतील पवार समर्थक आणि इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार यांनी शरद पवार यांना दगा देत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसले अशी टीका शिवसेनेचे संजय राऊत यांनी केली. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार आगपाखड केली. या दरम्यान, राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. अशा वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी एक वेगळेच ट्विट केले आहे.

“राष्ट्रवादीचे ५४ पैकी ५३ आमदार शरद पवार यांच्यासोबत राहतील. अजित पवार एकटे पडतील. शरद पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्नही मिटला. सुप्रिया सुळे, आपले अभिनंदन!”, अशा आशयाचे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे.

शरद पवार यांचे राजकीय वारसदार अजित पवार की सुप्रिया सुळे हा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे असं उत्तर बऱ्याचदा दिलं जातं. अजित पवारांच्या आग्रहामुळे निवडणुकीत उतरलेले त्यांचे पुत्र पार्थ पवार पराभूत झाले, तर शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी राजकारणात विजयी एन्ट्री घेतली. त्यामुळे विविध विषय लक्षात घेत अजित पवार यांनी अचानक भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar successor ajit pawar supriya sule digvijay singh tweet vjb
First published on: 24-11-2019 at 11:51 IST