कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ( १० मे ) मतदान होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील नेत्यांनीही प्रचार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सोमवारी ( ८ मे ) कर्नाटकात प्रचाराला गेले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. केंद्रातून जो आदेश येतो, तो बिचाऱ्या शिंदेंना पाळावा लागतो, असं शरद पवार म्हणाले आहेत.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६४ व्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी ( ९ मे ) साताऱ्यातील समाधी परिसरात शरद पवार यानी अभिवादन केलं. त्यानंतर शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “भाजपात आदेश देण्याची संस्कृती आहे. एकनाथ शिंदेंना ती मान्य करावीच लागते. केंद्रातून जो आदेश येतो, तो बिचाऱ्या शिंदेंना पाळावा लागतो. शिंदेंचं मुख्यमंत्रीपद भाजपाच्या आमदारांवर आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचारासाठी गेले,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेसमध्ये स्थान काय?”, शरद पवारांच्या विधानावर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…
कर्नाटकात प्रचारावेळी ‘बजरंग बली की जय’ अशी घोषणा देऊन मतं टाका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. यावर बोलताना शरद पवारांनी सांगितलं, “जेव्हा आम्ही निवडणुकीचा अर्ज भरतो. तसेच, निवडून आल्यावर राज्यपाल, सभापती आणि लोकांच्यासमोर आमचा लोकशाही, धर्मनिपेक्षतेवर विश्वास आहे, अशी शपथ घेतो. पण, धर्माच्या आणि जातीच्या नावानं मतं मागणं त्या शपथेचा भंग आहे. देशाचे पंतप्रधान या प्रकारची भूमिका देशासमोर मांडतात, याची मला गंमत वाटतं.”
हेही वाचा : …आणि सुषमा अंधारे शरद पवारांसमोरच ढसढसा रडल्या, म्हणाल्या, “माझं चुकत असेल तर…”
“सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत आहे. याचा अर्थ या सरकारला लोकांना सामोरे जायला भीती वाटतं आहे,” असेही शरद पवारांनी सांगितलं.