Sharad Pawar संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जावेद अख्तर यांची उपस्थिती होती. तसंच खासदार साकेत गोखले, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तकाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना टोला लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी संजय राऊत यांच्या पुस्तकाबाबत जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले होते की, “कथा-कादंबऱ्या वाचणं केव्हाच सोडलं आहे. तसंच आता बालवाड्मय वाचण्याचं माझं वयही राहिलेलं नाही. अशा गोष्टींवर फार गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही. ते कोण आहेत? मोठे नेते आहेत का?” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. हाच संदर्भ घेऊन शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला!

“सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पुस्तक न वाचता ते कसं काय समजलं माहीत नाही. प्रचंड टीका संजय राऊत आणि पुस्तक याच्यावर सुरु आहे. कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही, कुणी आणखी काय सांगितलं. अनेक मतं मांडली गेली. या पुस्तकात जी माहिती आहे त्यातून सत्तेचा गैरवापर कसा होतो त्याचं उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आणलं आहे. यंत्रणा कशी वागते याचं लिखाण या पुस्तकात आहे” असंही शरद पवार म्हणाले.

संजय राऊत, अनिल देशमुख यांच्याबाबत काय म्हणाले शरद पवार?

संजय राऊत यांना अटक करण्यात आली. त्यांना १०० दिवस त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. त्यामुळे आमच्यासह अनेकांना आता हे कळेल की तिथली स्थिती काय? ती स्थिती दुरुस्त करण्याचा विचार हा आज किंवा उद्या करावाच लागेल. तुरुंगातल्या आठवणी, अनेकांच्या भेटी गाठी, त्यांचे अनुभव हे लक्षात घ्यावं लागेल. एकनाथ खडसे हे आमचे सहकारी आहेत. त्यांचे जावई इंग्लंडमध्ये होते. टाटा कन्सल्टन्सी या संस्थेत जॉब करत होते. खडसेंच्या संदर्भात काहीतरी तक्रार आली तेव्हा त्यांचे जावई लंडनहून इथे आले, इथे आल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यांचा काहीही संबंध नव्हता. अनिल देशमुखांवर एका शासकीय अधिकाऱ्याने जी तक्रार केली होती ती १०० कोटींच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोपाची होती. शेवटी न्यायालयात जी केस उभी राहिली तेव्हा १०० मधली दोन शून्य गेली आणि १ कोटींचा भ्रष्टाचार केला असा आरोप त्यांच्यावर झाला. आरोप करणारे जे अधिकारी होते की राज्य सरकारने त्यावेळी भ्रष्टाचाराच्या संदर्भात काही कारवाई केली नव्हती. अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील.