आमदारकीचा राजीनामा का दिला याबाबत आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांची भूमिका मांडली. अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते राजकीय संन्यास घेतील का? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र याबाबत जेव्हा त्यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला तेव्हा शरद पवार हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत ते सांगतील तेच मी करणार असे अजित पवार यांनी सांगितले. तसंच शरद पवार यांनी माझं म्हणणं ऐकून घेतल्यावर, ” अजित तुझं म्हणणं मी ऐकून घेतलं आहे आता मी सांगेन ते करावं लागेल” असं पवार म्हणाल्याचं अजितदादांनी सांगितलं.
मात्र एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत त्यांनी यासंवादाचा पुढचा भागही सांगितला. ” पवारसाहेब म्हणाले की तुला बारामती लढवावी लागेल” अजित पवारांचं हे वाक्य संपताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की “अजित पवार बारामतीत प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांनी निवडणूक लढवायची नाही म्हटलं तरीही लोक त्यांना घराबाहेर काढून निवडणुकीला उभं करतील” त्यामुळे अजित पवार राजकीय संन्यास घेणार का या चर्चांना आपोआपच पूर्णविराम मिळाला आहे.