राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील कापड गिरण्यांच्या आंदोलनाचं उदाहरण देत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा दिलाय. कामगार नेते दत्ता सामंत यांनी कापड गिरण्यांचा संप पुकारला. “सामान्यपणे १०-१५ दिवस चालणारं आंदोलन त्यांनी अनेक महिने सुरू ठेवलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज मुंबईत कापड गिरणी नावाला देखील शिल्लक नाही,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच मुंबईत कापड गिरणी शिल्लक न राहिल्याचा फायदाच झाल्याचंही ते म्हणाले. ते विदर्भ दौऱ्या दरम्यान चंद्रपूरमध्ये बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “एक काळ होता जेव्हा मुंबईत सर्वाधिक टेक्सटाईल मिल होते. नेमकं काय झालं? दत्ता सामंत नावाचे कामगार नेते होते. आमच्यासोबतच होते. विधानसभेत आम्ही सोबतच होतो. त्यांनी एक आंदोलन केलं आणि टेक्सटाईल मिलचं काम बंद केलं. याआधी १० किंवा १५ दिवसांसाठी आंदोलन व्हायचं, पण त्यांनी अनेक महिने आंदोलन केलं. त्याचा परिणाम म्हणून मुंबईतील संपूर्ण टेक्सटाईल मिल कमकुवत झाल्या. आज मुंबईत टेक्सटाईलचं नाव देखील शिल्लक नाही.”

“मुंबईत कापड गिरणी शिल्लक न राहिल्याचा फायदा”

“मुंबईत कापड गिरणी शिल्लक न राहिल्याचा फायदाही झाला. यानंतर आज टेक्सटाईल मिलचं विकेंद्रीकरण झालंय. एकाच ठिकाणी केंद्रीकरण राहिलं नाही. जसं की इचलकरंजीत ज्यूट आहे, सुतीच्या गिरण्यात आहे. तिथं सूत तयार होतं. त्यानंतर कपडे तयार होतात, मग त्याच्या रंगावर काम होतं आणि पुढेही बरीच प्रक्रिया होते. कुठं सूत गिरणी, कुठं पॉवरलूम, कुठं रंगावर काम होईल. असं ५-६ जागांवर छोटे छोटे उद्योग तयार होऊन या क्षेत्राचं विकेंद्रीकरण झालं,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : “ ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्या पक्षाच्या नेत्यांची भूमिका ही तेल ओतून आग वाढविण्याची होती ”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“यात टेक्सटाईल पार्कचाही उपयोग होतो. सरकार येथे पायाभूत सुविधा पुरवते आणि वेगवेगळे कापड उद्योगातील व्यापारी तेथे येऊन आपआपलं काम करतात. मी स्वतः मागील १० वर्षांपासून माझ्या मतदारसंघात अशी टेक्सटाईल इंडस्ट्री उभी करण्यासाठी प्रयत्न केलेत. मला आनंद वाटतो की तिथं आज ८,००० महिला काम करतात. एका युनिटमध्ये वेगवेगळे १४ उपभाग आहेत. कॉटनकिंग आणि इतर कंपन्यांचा त्यात समावेश आहे. आपल्याला या विकेंद्रीकरणाच्या पर्यायाचा विचार करायला हवा,” असंही पवारांनी नमूद केलं.