राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर पक्षचिन्ह दिलं आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही माहिती देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिला होता. त्यानंतर शरद पवार गटाला नेमकं कोणतं नाव किंवा चिन्ह मिळणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली होती. त्यासाठी शरद पवार गटाकडून तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलं. परंतु, हे नाव येत्या २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपुरतं होतं. त्यामुळे या निवडणुकीकरता पक्षाला चिन्ह देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे हे प्रकरण शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात नेले होते.

हेही वाचा >> Breaking: अखेर शरद पवार गटाला नाव मिळालं, ‘या’ नावावर निवडणूक आयोगाचं शिक्कामोर्तब!

सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीनुसार शरद पवार गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसंच, अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आठवड्याभराच्या आत चिन्हाबाबत निर्णय देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते. परंतु, त्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी एकही चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलं नाही. तर, निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत तुतारी हे पक्षचिन्ह शरद पवार गटाकडे राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोस्ट काय?

“एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी!”, अशी केशवसुतांची कविता पक्षाच्या अधिकृत खात्यावरून पोस्ट करण्यात आली आहे. तसंच, “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”, असंही पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.