नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे. अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर नेरुळ पोलिसांकडून गुन्हा दाखल होताच मनसेचे शहराध्यक्ष व प्रवक्ते गजानन काळे यांनी सरकारच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उभे केले आहे. यामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अमित ठाकरे यांनी रविवारी नेरुळ सेक्टर-१ च्या शिवस्मारकातील महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर नेरुळ पोलिसांनी याची गंभीर दखल घेत अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान याबाबत आता शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अमित ठाकरे काय म्हणाले होते?
नवी मुंबई महापालिकेकडून महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी चार महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या दिरंगाईला प्रत्युत्तर म्हणूनच हे अनावरण करण्यात आल्याचा दावा मनसेने केला आहे. सदर पुतळा ज्या कापडाने झाकून ठेवला होता ते कापडही मळके झाले होते. त्यामुळे “महाराजांना मळक्या कापडात गुंडाळलेले पाहू शकलो नाही, म्हणूनच पुतळ्याचे अनावरण केले.” असे अमित ठाकरे यांनीही स्पष्ट केले होते.
शर्मिला ठाकरे काय म्हणाल्या?
मला अमितचा अभिमान आहे. मी वाट बघते आहे आता माझ्यावर कधी केस दाखल होईल? यांना निवडणुकीसाठी फक्त शिवाजी महाराज पाहिजेत, किल्ल्यावर हे नमो सेंटर उभारणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, आम्ही हे होऊ देणार नाही. निवडणुकीसाठी यांना केवळ महाराज दिसतात. पंतप्रधान तिथं येऊन गेले, पण त्यांना वेळ शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी वेळ मिळाला नसेल, असे म्हणत अमित ठाकरेंवर दाखल गुन्ह्यासंदर्भात भूमिका मांडली. तसेच, १८०० कोटींचा जामीन घोटाळा होतो, पण गुन्हा दाखल होत नाही. अजित पवार म्हणतात हे काही घडलंच नाही मग व्यवहार कसा झाला? असाही प्रश्न शर्मिला ठाकरेंनी विचारला आहे.
मुंबईतल्या किल्ल्यांची अवस्था काय आहे?
छत्रपती शिवरायांचा अभिमान आहे का? वांद्रे किल्ल्यावर परवा दारु पार्टी सुरु होती. माहीम किल्ल्यावर झोपडपट्टी झाली आहे. या सगळ्या परवानगी कोण देतं? एखादा किल्ला ताब्यात घेता येईल असं जर कळलं तर सरकार तिथेही जाऊन रजिस्ट्रेशन करेल आणि किल्ला ताब्यात घेईल असाही खोचक टोला शर्मिला ठाकरेंनी लगावला.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाबाबत काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?
खोटं बोला पण रेटून बोला असं काम सध्या सुरू आहे. बिहारमध्ये आकडेवारीनुसार ४ कोटी मतदार होते आणि ७ कोटी मतदान झाले आहे. मुंबईसह राज्यातून ट्रेन भरून तिकडे गेल्या आहेत, ते तिकडे आणि इकडेही मतदान करणार. एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेत आहात आणि सर्वोच्च न्यायालयाला निकाल द्यायला तीन वर्षे वेळ नाही? आता पुढची सुनावणी जानेवारीत आहे तोपर्यंत निवडणुका निघून जातील मग सुनावणी घेऊन काय होणार? अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवरुन नाराजी व्यक्त केली.
