Shashikant Shinde Sharad Pawar NCP State President : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. मात्र, या चर्चा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी फेटाळून लावल्या होत्या. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मुंबईत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अखेर आमदार शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे आदी नेते उपस्थित होते.
शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, “मला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आल्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच मी महाराष्ट्रातील जनतेला ग्वाही देतो की राज्यातील प्रत्येक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करेन. तसेच पक्ष संघटना राज्यात सगळीकडे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन. पक्षात अनेक जेष्ठ नेते असतानाही मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली, या संधीचं १०० टक्के सोनं करण्याचा मी प्रयत्न करण्याचं काम करणार आहे” असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, “मी याआधी देखील सांगितलं होतं की सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता नेता कसा होतो? हे आर आर पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. तशा प्रकारचं काम करून सर्वासामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात मी कायम आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार आहे, वेळ पडली तर रस्त्यावर देखील उतरण्यास मागेपुढे पाहाणार नाही. आगामी महापालिका निवडणुका पाहिल्या तर आमच्यासमोरील आव्हाने मोठी असणार आहेत”, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
“आता एका महिन्यांत संपूर्ण राज्यात दौरा करून पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेन. तसेच अनेक तरुणांना देखील पक्षात काम करण्याची संधी देईन. राज्याचा दौरा झाल्यानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नक्कीच यश येईल. तसेच विरोधी पक्षाचा स्पेस भरून काढण्याचा देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. पक्षाच्या प्रत्येक सेलची मी बैठक घेऊन सर्वांशी संवाद साधणार आहे. तसेच नवीन लोकांना देखील पक्षात काम करण्याची संधी देणार आहे”, असंही शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.