राहाता : शेडगाव येथे प्रवरा नदीवरील नवीन पुलालगत चारवर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने झडप घातल्याची धक्कादायक घटना घडली. हल्ल्यात हा चिमुकला जखमी झाला असून, त्याचा जीव वाचविण्यासाठी आई व आजीने उसाच्या शेतात घुसून बिबट्याशी दोन हात करून त्याची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. आई आणि आजीने दाखवलेले अद्वितीय धाडस परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
श्रीधर बंडू फड (वय ४) असे जखमी मुलाचे नाव आहे. निवृत्त ग्रामविकास अधिकारी लहानु फड यांचा नातू श्रीधर हा आई भारती यांच्यासह माहेरी शेडगाव येथील प्रवरा नदीवर नवीन पुलालगत असलेल्या संपत सावित्रा नागरे यांच्या घरी आला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास आई भारती फड, आजी सिंधूबाई नागरे आणि मामा शुभम नागरे हे गवत कापण्यासाठी शेतात गेले होते. त्या वेळी गवताच्या शेतात बसलेल्या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून त्याला शेजारील उसाच्या शेतात ओढून नेले.
घटनेदरम्यान मुलाचे आर्त ओरडणे ऐकून आई व आजी थेट उसाच्या शेतात धावल्या. जिवाची पर्वा न करता त्यांनी बिबट्याच्या मागे जाऊन श्रीधरला खेचून घेतले. मामा शुभम नागरे यांनी तत्काळ जखमी अवस्थेत मुलाला उपचारासाठी आश्वी येथे आणि पुढे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, श्रीधरला सर्वतोपरी उपचार मिळावेत यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. तसेच वन विभागाला तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी रात्रीच्या वेळी अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. संगमनेर वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून, पथक शेडगाव येथे पिंजरे घेऊन दाखल झाल्याची माहिती शेडगावचे पोलीस पाटील ॲड. दिलीप सांगळे यांनी दिली.
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले वाढलेले आढळत आहेत. जिल्ह्याच्या उत्तर भागात, उसाचे क्षेत्र अधिक असलेल्या भागात बिबट्यांचे वास्तव्य आढळत होते. परंतु आता जिल्ह्याच्या दक्षिण भागातही बिबटे सर्रास आढळू लागले आहेत. पारनेर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात एक मजूर व एक बालक मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.