सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरून आज (रविवार) भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रम भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यासोबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह धनगर समाजातील शेकडो कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरले होते. यामुळे मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता.

राष्ट्रवादा काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यास आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. पाच मेंढपाळांच्या हस्ते या लोकार्पण केले जावे, अशी त्यांनी मागणी लावून धरली होती व त्यानुसार लोकार्पणासाठी ते पुतळ्याकडे जात असताना त्यांना पोलिसांनी मल्हारराव चौकात रोखून धरल्याने बराचवेळ गोंधळ सुरू होता. अखेर आम्ही अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर मेंढपाळाच्या हस्ते ड्रोनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी केली असल्याचे सांगत, पडळकर यांनी लोकार्पण झाले असल्याची माहिती माध्यमांना दिली. यावेळी उपस्थिती कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून व झेंडे फडकावून आनंदोत्सव साजरा केला. शिवाय, घोषणाबाजी देखील करण्यात आली.

सरकार जरी चुकीचं वागलं तरी आम्ही चुकीचं वागणार नाही –

”आता आपण डिजिटल इंडियामध्ये वावरतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणं आहे की डिजिटल इंडिया झाला पाहिजे. पोलीस प्रशासन आज आम्हाल विरोध करत आहे. महिला पोलिसांना समोर करण्यात आलं आहे, म्हणजे आमचा त्यांच्यासोबत वाद झाल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल करता येतील. परंतु मेंढपाळाच्या हस्ते ड्रोनमधून गुलाबाची फुलं अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावरती टाकून हा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. आमचा हेतू स्पष्ट होता तो पूर्ण झाला. आम्ही मेंढपाळाच्या हस्ते डिजिटल इंडियामध्ये ड्रोनचा वापर करून, आम्ही त्या स्मारकावरती फुलं टाकली उद्घाटन केलं. पोलिसांशी संघर्ष केला नाही. सरकार जरी चुकीचं वागलं तरी आम्ही चुकीचं वागणार नाही.” अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांना दिली.

सांगली महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या अहिल्यादेवी स्मारकाच्या लोकार्पणावरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा उघड संघर्ष निर्माण झाला आहे. या स्मारकांचे लोकार्पण २ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून त्याला भाजपने  विरोध दर्शवत तत्पूर्वीच २७ मार्च रोजी लोकार्पण करण्याचा इशाराही दिला होता.

अहिल्यादेवींच्या स्मारक लोकार्पणाचा वाद चिघळला ; सांगलीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 महापालिकेने विजयनगर परिसरातील सुमारे  ३० हजार चौरस फुटांच्या भूखंडावर अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारले आहे.  २०१० पासून या स्मारकाचे काम सुरू होते. आता ते पूर्ण झाले असून यासाठी अडीच कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. या जागेवर अहिल्यादेवींचे स्मारक, अतिथिगृह, वाचनालय इमारत उभारण्यात आले असून खुल्या जागेत बागही तयार करण्यात आली आहे.