शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षातील महिला नेतृत्त्वांवर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांच्यावर अनेक आरोप केले. तसंच, “आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा”, अशी टीकाही त्यांनी केली होती. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून माहिती दिली.

“उबाठा गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा.शिल्पा बोडखे यांनी आज वर्षा या निवासस्थानी येऊन हाती भगवा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स पोस्टवर म्हटलंय.

हेही वाचा >> “हाताचा मटणाचा वास गेला असेल तर…”, उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहित शिल्पा बोडखेंचा पक्षाला जय महाराष्ट्र!

“विदर्भात शिवसेना वाढवण्याचे, सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्याचे काम आजवर त्यांनी आपल्या पूर्ण क्षमतेने व प्रामाणिकपणे केले होते. यापुढे त्याच प्रामाणिकपणे पक्षाचे काम त्यांनी करावे आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवावेत”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. या पक्षप्रवेशामुळे विधानपरिषदेच्या उपसभापत नीलम गोऱ्हेही उपस्थित होत्या.

राजीनामा देताना शिल्पा बोडखे काय म्हणाल्या होत्या?

आपण शिवसेनेच्या पूर्व महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना भवनात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला असे मला वाटतं.

शिवसेना पक्षात शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे, पण आता मला कळाले की येथे विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार दिले असून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला देखील त्या जुमानत नाहीत.

मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत बसल्या. मला सोशल मीडियाचे काम करायचे नाही असं पत्र मी आदित्य ठाकरे यांना पाठवले, परंतु विशाखा राऊत यांना मी काम करून नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असं वाटत आहे.

जर यांना संघटना वाढवण्यापेक्षा षडयंत्र रचण्यात एवढा आनंद होत असेल तर मी आपल्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता पदाचा राजीनामा देत आहे. माझा पक्षात टिश्यू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे कोणाचे असेल राजकीय आयुष्य बरबाद करून नका, नाहीतर कोणताही मराठी माणूस मराठी माणसाच्या आणि पक्षाच्या पाठिशी उभा राहणार नाही. कारण शिवसेना पक्षात काम करणाऱ्या लोकांपेक्षा येथे चुगल्या चहाड्या करणाऱ्या आणि षडयंत्र रचणाऱ्यांना जास्त महत्व आहे.