शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीला ७५ तोळं सोनं अर्पण केलं आहे. प्रताप सरनाईक आपल्या कुटुंबीयांसबत तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी तब्बल ३७ लाख ५० हजार किंमतीचे ७५ तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले. आपण केलेला नवस पूर्ण झाल्याने दागिने अर्पण केल्याचं प्रताप सरनाईक यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुळजाभवानी आमची कुलदैवता आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नावेळी नवस केला होता. तसंच दोन्ही नातवंडांचं जायवळ करायचं होतं. नवस फेडण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. नवस केला होता तेव्हा ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्याचा हार देईन असं म्हटलं होतं. मध्यंतरी करोना काळ आणि काही संकटांमुळे येता आलं नव्हतं. प्रसिद्धी किंवा प्रसारमाध्यमांसाठी हे काही केलेलं नाही. वर्षातून एकदा मी दर्शनासाठी येत असतो,” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

रिक्षाचालक ते सव्वाशे कोटींचा मालक… प्रताप सरनाईक यांचा थक्क करणारा प्रवास

देवीकडे मांडलेलं गाऱ्हाणं पूर्ण झाल्यानेच पत्नी, दोन्ही मुलं, सूना आणि नातू यांना घेऊन आलो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “मी पहिल्या मुलाच्या लग्नावेळी ५१ तोळ्याचा आणि दुसऱ्या मुलाच्या लग्नावेळी २१ तोळ्याचा हार घालेन असं म्हटलं होतं. पत्नीनेच साकडं घातलं असल्याने तिने सोनाराकडून दागिने बनवून घेतले होते. दोन वर्षांपासून ते दागिने आमच्याकडे होते. करोनामुळे मंदिरं बंद होती, तसंच इतर संकटं आमच्यावर होती त्यामुळे येऊ शकलो नव्हतो. पण आता वेळ मिळाल्याने आम्ही आलो,” अशी माहिती प्रताप सरनाईकांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde faction mla pratap sarnaik donates gold worth 37 lakh in tuljabhavani temple in osmanabad sgy
First published on: 24-11-2022 at 11:03 IST