मुंबईत आम्ही चांगले रस्ते तयार करायला घेतले आहेत. तसंच मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. याच रस्त्यांच्या कामावरून आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यावर आता भरत गोगावले यांनी उत्तर दिलं आहे. संसार सुरू केला की माणूस परिपक्व होतो त्यासाठी आदित्य ठाकरेंना अजून वेळ आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे भरत गोगावले यांनी?
आदित्य ठाकरेंना हे समजायला पाहिजे होतं की आपण काय करू शकलो नाही. आत्ता जे केलं जातं आहे त्यात चुकीचं काय? हे त्यांनी दाखवावं. रस्त्यांची कामंही सुरू झालेली नाहीत आणि त्यांना भ्रष्टाचार कसा दिसला? कामला सुरूवात झाल्यावर बिलं होतील त्यानंतर आरोप केला तर ठीक आहे. आदित्य ठाकरेंना कुठून स्वप्न पडलं माहित नाही. मला तर वाटतं यांना स्वप्न असं पडलं आहे की मुंबईची महापालिका ही आपल्या हातून गेली आहे. काळ्या दगडावरची ही रेष आहे. आपण काही करू शकलो नाही मग आता समोरच्याच्या चुका काहीतरी दाखवायला पाहिजेत म्हणून हे आरोप केले जातात. माणसाने संसाराला सुरूवात केल्याशिवय तो परिपक्व होत नाही असं म्हटलं जातं. आदित्य ठाकरेंना अजून त्यासाठी वेळ आहे असाही टोला भरत गोगावले यांनी लगावला आहे.
विकास करायला तुम्हाल कुणी रोखलं होतं?
आदित्य ठाकरेंनी आधी दुसऱ्यावर टीका करण्याआधी आणि शिंतोडे उडवण्याआधी आपण काय केलं हे बघावं. तुमच्या हातात इतकी वर्षे महापालिका आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. मग अशावेळी तुम्हाला चहल यांनी विकास कामं करायला अडवलं होतं का? तुम्ही एखादं काम सुरू केलं आणि कुणी कोर्टात गेलं असं झालंय का? आता जे गटारगंगेचं पाणी पाहाता आहात. मिठी नदीचा गाळ काढला त्यापेक्षा वेगळं काय केलं? डिपॉझिट केलं डिपॉझिट केलं हे काय सांगता? त्याचा जनतेसाठी काय वापर केला सांगा. असंही भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
आमचा नाद करू नका संजय राऊत
संजय राऊत म्हणत आहेत की आम्ही जे प्रकल्प सुरू केले, पायाभरणी केले त्याच प्रकल्पांचं उद्घाटन मोदी करणार आहेत. याबाबत विचारलं असता भरत गोगावले म्हणाले की पायाभरणी कधी केली? जरा तारीखवार सांगा. पायाभरणी केल्यावर पुढे काय केलं? काहीच नाही. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सगळ्या विषयीची ऑर्डर देऊन टाकली. आमचा नाद करू नका. जे चुकीचं आहे त्यावर बोट ठेवा पण चुकीचं काही नाही तर बोलू नका. तुम्हाला कोण आडवं आलं ते तरी सांगा. उगाच आरोप करायचे म्हणून करू नका असंही भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.