Shivsena Ministers absent in Cabinet Meeting Reason : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी राज्यभर जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपात वेगवेगळ्या पक्षांमधून इनकमिंग चालू आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना (शिंदे) व भाजपात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध म्हणून आज (१८ नोव्हेंबर) मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचा दावा केला जात आहे. अनेक प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंव्यतिरिक्त शिवसेनेचे कोणतेही मंत्री उपस्थित नव्हते.

दरम्यान, यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग चालू आहे. अनेक मंत्र्यांकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांचं प्रभारीपद आहे. त्यामुळे काही मंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्ये आहेत. इथे नाराजीचा कुठलाही विषय नाही.”

चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं मंत्र्यांच्या गैरहजेरीचं कारण

बावनकुळे म्हणाले, “राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग चालू आहे. अनेक मंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची संख्या कमी होती. मंत्र्यांच्या गैरहजेरीचं दुसरं कुठलंही कारण नव्हतं. दुसरा कुठलाही विषय नाही. अनेक मंत्री हे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रभारी आहेत. त्यामुळे ते त्या-त्या जिल्ह्यांमध्ये आहेत. या मंत्र्यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती. त्यानंतर ते आपापल्या भागात गेले आहेत.”

बावनकुळेंनी प्रसारमाध्यमांचे दावे फेटाळले

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेही काही मंत्री त्यांच्या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांची संख्या कमी होती. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री (एकनाथ शिंदे व अजित पवार) या बैठकीला उपस्थित होते. आताही त्यांची वैगळी बैठक चालू आहे. नुकतीच इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक पार पडली. आता वनविभागाची बैठक चालू आहे. मात्र, प्रसारमाध्यमं जी बातमी दाखवत आहेत तसं काहीच नाही.”

कल्याण-डोंबिवलीत भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’, शिवसेनेची नाराजी?

दरम्यान, यावेळी बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला की मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंव्यतिरिक्त शिवसेनेचे एकही मंत्री नव्हते, मंत्र्यांच्या बहिष्काराचं कारण काय? यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की कल्याण-डोंबिवलीत भाजपाने शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे का? यावर बावनकुळे म्हणाले, “तसा काहीच विषय नाही. तुम्हा माध्यमांचा अंदाज चुकीचा आहे. महायुतीत कुठेही नाराजी नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत.”

मंत्रिमंडळ बैठकीवरील मंत्र्यांच्या बहिष्काराबाबत उदय सामंत काय म्हणाले?

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीवर मंत्री उदय सामंत म्हणाले, आम्हाला जे हवं आहे ते आम्ही एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच सांगणार. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. बाकी योगायोगानेच मंत्री बैठकीला अनुपस्थित होते. असे योगायोग भविष्यात अनेक वेळा येतील. आजची बैठक ही खेळीमेलीच्या वातावरणात पार पडली आहे. मी आरोग्य तपासणीसाठी गेलो होतो. त्यामुळे मी बैठकीला उपस्थित नव्हतो. मात्र, आमचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या बैठकीला हजर होते. आमच्या मनात जे होतं ते आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. आम्ही कुठेही मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकलेला नाही. आमचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे कोणीही याला बहिष्कार म्हणून शकत नाही. मी मंत्रालयात नव्हतो. मी वैद्यकीय तपासणीसाठी गेलो होतो. त्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही.