राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल (१ मे) वर्षा बंगल्यावर भेट झाली. या भेटीनंतर राज्यातील राजकारणात बरीच चर्चा झाली. परंतु, एका कार्यक्रमाचे आमंत्रण देण्याकरता ही भेट झाली असल्याची माहिती खुद्द शरद पवारांनी ट्वीटद्वारे दिली. यावरून आज ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेवर प्रहार केले आहेत. प्रमुख नेता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला निमंत्रण द्यायला गेला त्यात राजकारण काय असू शकतं. शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. राज्याच्या दुर्दैवाने म्हणा मुख्यमंत्री पदावर एक व्यक्ती बसली आहे, तो मुख्यमंत्री पदाचा मान असतो. व्यक्तीचा नसतो. त्यामुळे ते आमंत्रण द्यायला गेले. यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून गेलं वगैरे, काही नाही हललं. असतं हलतं का. त्यांचं सिंहासन हलणार आहे लवकरच. शरद पवार आणि मुख्यमंत्री भेटले असतील तर ती औपचारिक भेट आहे. त्यांच्या संस्थेचा सोहळा आहे म्हणून आमंत्रण द्यायला गेले. अशा पद्धतीने कोणी कोणाकडे जायला नको. विरोधी पक्षातील आमदार एकमेकांना भेटत असतात एकमेकांच्या चेंबरमध्ये. त्यांची बैठक आहे, भेटले असतील. जनतेचा विषय नाहीय, असं संजय राऊत म्हणाले. आज सकाळी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. जागावाटप सुरळीतपणे पार पडेल लोकसभा आणि विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडेल. कोणालाही चिंता वाटायचं कारण नाही. माझं स्पष्ट मत आहे, लोकसभेचे जागावाटप व्यवस्थित बसून चर्चा होईल. प्रत्येक जागेचा उहापोह केला जाईल. ही जागा कोण जिंकू शकेल, कशाप्रकारे जिंकू शकेल, एकमेकांना कशाप्रकार सहकार्य केलं पाहिजे, त्यासंदर्भात चर्चा करू. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. विधानसभेचं जागावाटपही त्याच पद्धतीने होईल. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद होणार नाहीत. महाविकास आघाडी ज्याला आम्ही वज्रमुठ म्हणतो ते कायम राहिल, असंही संजय राऊत म्हणाले. "बेकायदेशीर सरकारला लाथ मारेल हा आमच्या महाअधिवेशनाचा अजेंडा आहे. शिवसेनेसोबत जी बेईमानी झाली आहे त्यांना नेस्तनाबूत करणे, शिवसेना एक पक्ष म्हणून संघटना म्हणून पुन्हा एकदा शिखरावर घेऊन जाणं हा आमचा मुख्य कार्यक्रम आहे", असंही ते म्हणाले.