राहाता: श्री साईबाबा संस्थान आयोजित १०७ वा श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवास बुधवारी शिर्डीत मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे श्रींची प्रतिमा व पोथीच्या मिरवणुकीने सुरुवात झाली. उत्सवानिमित्त मुंबईतील साई द्वारकामाई मंडळाने मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व समुद्र मंथनातील श्री साईरत्न आकर्षक देखावा तर ओरिसातील साईभक्त सदाशिव दास यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

पहाटे श्रींची काकड आरती, नंतर श्री साईबाबांच्या प्रतिमा व श्री साईसच्चरित ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी सहभाग घेतला. श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणास सुरुवात करण्यात आली. श्रींची पाद्यपूजा व मध्यान्ह आरतीनंतर रात्री शिर्डी गावातून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात आले होते.

उद्या गुरुवार या उत्सवाच्या मुख्य दिवशी सकाळी ९ वा. भिक्षा झोळी कार्यक्रम, दुपारी साईभजन, सायंकाळी खंडोबा मंदिरात सिमोल्लंघन, कार्यक्रम रात्री ९ वा. शिर्डी गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक, रात्री श्रींच्या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे शेजारती व शुक्रवारी पहाटे काकड आरती होणार नाही. पुण्यतिथी उत्सवामुळे शिर्डीमध्ये साईभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

पूरग्रस्तांसाठी ५ कोटींची मदत

अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी श्री साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीस यापूर्वी संस्थानने १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, संकटाची भीषणता लक्षात घेऊन मदतीची रक्कम वाढवून ५ कोटी रुपये करण्याचा निर्णय देवस्थानच्या तदर्थ समितीने घेतला. उच्च न्यायालयाच्या मान्यतेसाठी वाढीव मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. – गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान

साईचरणी १३ लाखांचे सुवर्णकडे दान

नारायणगाव (पुणे) येथील साईभक्त श्रीमती साधना सुनील कसबे यांनी श्री साईबाबांच्या चरणी तब्बल १३ लाख १२ हजार ५३८ रुपये किमतीचे सोन्याचे कडे अर्पण केले. अत्यंत आकर्षक आणि सुंदर नक्षीकाम असलेले हे सुवर्णकडे १२३.४४० ग्रॅम वजनाचे आहे.