पाथरी ही साईजन्मभूमी असल्याबाबतचे वक्तव्य मुख्यमंत्री मागे घेत नाहीत तोपर्यंत रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. भाविक आपल्यासाठी देवच आहे, त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वानी काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बंदमधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून, साई मंदिर सुरू राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाथरीला निधी देण्यास विरोध नसून त्याचा साई जन्मभूमी उल्लेख करण्यास आमचा आक्षेप आहे, अन्य आठ जन्मस्थळाच्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे ग्रामसभेत सांगण्यात आले. रविवारी सकाळी शिर्डी ग्रामस्थांनी द्वारकामाई येथे जमून शहरातून परिक्रमा काढण्याचे ठरवले असून, यामध्ये साईचरित्रातील ओव्यांचे फलक हातात घेऊन साईजन्मभूमीबाबत कुठेही उल्लेख नसल्याचा संदेश देणार आहे.

शिर्डीकरांची भूमिका कोणाच्या विरोधात नाही, परंतु ज्या लोकांनी बेछूट आरोप करीत मुक्ताफळे उधळली त्या प्रवृत्तींचा मी जाहीर निषेध करतो. शिर्डीत बंदला माझे पूर्ण समर्थन असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांनी केले.

या ग्राम सभेचे अध्यक्षपद सुधाकर शिंदे यांनी भूषविले. या वेळी शिर्डीतील सर्व नगरपंचायतीचे पदाधिकारी, दूध संघ सोसायटी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी बोलाविली बैठक : शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याच्या ग्रामस्थांच्या निर्णयानंतर या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मंत्रालयात सर्व संबंधितांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीस शिर्डी आणि पाथरीमधील संबंधितांना बोलाविण्यात आले आहे. शिर्डीच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी मध्यममार्ग काढावा, अशी मागणी सर्व संबंधितांनी केली आहे. शिर्डी बंद मागे घेण्याची विनंती शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असली तरी ती फेटाळून लावण्यात आली.

वाद काय? : साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद निर्माण झाला आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले नाव, जात व धर्म उघड केला नाही. पण साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्य़ातील पाथरी येथे असल्याची चर्चा सुरू झाल्याने वादाला तोंड फुटले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पाथरीच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देण्याचे जाहीर केल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे. पाथरीच्या विकासाला शंभर कोटी देण्यास आमचा विरोध नाही. पण बाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याच्या तर्काला आमचा विरोध आहे. बाबांनी जन्मस्थळ उघड केले नाही. पण ठाकरे यांच्यामुळे जन्मस्थानावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ते भाविकांच्या श्रद्धा दुखावणारे आहे. त्यामुळे पाथरीची जन्मस्थान म्हणून ओळख नको, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी रविवारपासून बेमुदत शिर्डी बंदचे आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shirdi closed today due to sai birthplace dispute abn
First published on: 19-01-2020 at 01:38 IST